फुले दाम्पत्यांनी रोवली स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ; भिडेवाडयातील मुलींची पहिली शाळा १७५ वर्षांत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 01:35 PM2023-01-01T13:35:19+5:302023-01-01T13:35:27+5:30
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेल्या पुण्यातील भिडेवाड्याचे रूपांतर राष्ट्रीय स्मारकात करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे
पुणे: बुधवार पेठेतील ज्या भिडे वाड्यात स्त्रियांसाठीची पहिली शाळा सुरू करण्यात आली. त्या शाळेला रविवारी १७५ वर्षे होत आहे. हा भिडेवाडा गेले अनेक वर्षांपासून पडक्या अवस्थेत आहे.
महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी दि. १ जानेवारी १८४८ राेजी भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. हा दिवस स्त्री शिक्षण गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेल्या पुण्यातील भिडेवाड्याचे रूपांतर राष्ट्रीय स्मारकात करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच दिली आहे़. या प्रश्नावर तत्काळ बैठक घेऊन मार्ग काढला जाईल, याशिवाय स्मारकासाठी जे पैसे लागतील ते पैसे खर्च केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच विधानसभेत दिले होते.
आमदार छगन भुजबळ यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आता भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्याचा निर्णय घेण्यात आला. भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देऊन या ठिकाणी सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक डाॅ. बाबा आढाव यांनी उपोषण केले होते.
पुणे महानगरपालिकेने हेरिटेज वास्तूंची यादी तयार केली असून, त्यामध्ये भिडेवाड्याचा समावेश आहे. ही ऐतिहासिक वास्तू पुणे महापालिकेच्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने २१ फेब्रुवारी २००६ रोजी मान्यता दिली आहे. परंतु, तेथील नऊ गाळेधारकांनी पुनर्वसनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने गेले अनेक वर्षे ही सर्व प्रक्रिया थांबली होती.
तत्कालीन नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांची या केसबाबत दोन वर्षांपूर्वी विधान परिषदेत आश्वासन दिले होते. तरीही पुढे काही झाले नाही. आता त्यांनी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रीय स्मारकाची घोषणा केल्याने यासाठी लढा देणाऱ्या सर्व सामाजिक संस्थांनी समाधान व्यक्त केले होते.