Love Marriage: दाम्पत्यांनी पळून जाऊन लग्न केले; ८ वर्ष वेगळे राहूनही भलतंच काहीतरी घडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 03:58 PM2022-02-10T15:58:46+5:302022-02-10T15:59:04+5:30
आठ वर्षे एकमेकांपासून वेगळे राहात असल्याने आणि दोघांचीही परत एकत्र नांदण्याची तसूरभरही शक्यता नसल्याने अवघ्या आठ दिवसात कौटुंबिक न्यायालयाने त्यांना घटस्फोट मंजूर केला.
पुणे : दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. घरच्यांचा लग्नाला विरोध असल्याने दोघांनी मुंबईला पळून जाऊन धर्मशास्त्राप्रमाणे लग्न केले. पण तीन महिन्यातच दोघांमध्ये वैचारिक मतभेद सुरू झाले आणि तिची पुण्यामध्ये नोकरीची व राहाण्याची व्यवस्था करून तो रत्नागिरीला गावी शेती करायला गेला. दोघांच्याही लग्नाला तब्बल आठ वर्षे झाली. पण सोबत राहिले केवळ तीनच महिने. अखेर परस्पर संमतीने दोघांनीही घट्स्फोटासाठी दावा दाखल केला. आठ वर्षे एकमेकांपासून वेगळे राहात असल्याने आणि दोघांचीही परत एकत्र नांदण्याची तसूरभरही शक्यता नसल्याने अवघ्या आठ दिवसात कौटुंबिक न्यायालयाने त्यांना घटस्फोट मंजूर केला.
राज आणि सीमा (दोघांची नावे बदलेली) दोघेही रत्नागिरी या एकाच गावी राहाणारे आहेत. दोघांचे प्रेम जमल्यानंतर लग्न करण्याची इच्छा त्यांनी कुटुंबियांसमोर व्यक्त केली. परंतु घरच्यांचा लग्नाला विरोध होता. दोघांनी मुंबईला पळून जाऊन लग्न केले. लग्नानंतर दाम्पत्य कामधंदा शोधण्यासाठी पुण्यात आले आणि एका मॉलमध्ये कामाला लागले. परंतु तीन महिन्यातच दोघांच्या आवडीनिवडी वेगळ्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे दोघांनी वेगळे राहाण्याचा निर्णय घेतला. दोघांच्याही लग्नाला तब्बल साडेआठ वर्षे झाली होती.
त्यामुळे दोघांनी घट्स्फोटासाठी अँड शशिकांत एस बागमार, अँड निनाद एस.बागमार आणि अँड गौरी एस. शिनगारे यांच्या मार्फत पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोट मिळण्याकरिता 31 जानेवारी रोजी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या न्यायालयात दावा दाखल केला. कायद्याप्रमाणे दहा महिन्याचा कालावधी जाणे आवश्यक होते. परंतु वकिलांनी दाव्यामध्ये सहा महिन्याचा कालावधी वगळण्यात यावा व लवकरात लवकर हा दावा निकाली काढण्यात यावा असा युक्तिवाद न्यायालयासमोर केला. दोघांची पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून दाम्पत्याला 8 फेब्रुवारी रोजी म्हणजे अवघ्या आठ दिवसांमध्ये घटस्फोट मंजूर केला.