Sinhagad Fort: दरड कोसळली! पुणेकरांच्या आकर्षणाचं ठिकाण सिंहगड पर्यटन बंद; प्रशासनाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 06:27 PM2024-07-30T18:27:18+5:302024-07-30T18:27:47+5:30
सोमवारी झालेल्या पावसाने सिंहगडावरील वाहनतळाच्या एक किलोमीटर वर ही दरड कोसळली होती
Sinhagad Fort : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाने काही काळ उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. किल्ले सिंहगडावर रात्री दरड कोसळल्याची घटना घडली. दरम्यान आता दरड हटवण्याचे काम सुरु असून तुर्तास प्रशासनाने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरड कोसळल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने आणि रात्री येथील वाहतूक बंद ठेवण्यात येत असल्याने येत असल्याने मोठी दुर्घटना टळली.
पुणेकरांचं आणि पुण्यात येणाऱ्या पर्यटकांचं आकर्षणाचं ठिकाण असलेल्या सिंहगडचं पर्यटन पुढील काही दिवसांसाठी बंद करण्यात आलं आहे .सोमवारी मध्यरात्री गड परिसरात मोठा पाऊस झाला. त्यामुळे गडावरील वाहनतळाच्या एक किलोमीटर वर ही दरड कोसळली. दगड आणि मातीचा मोठा ढीग रस्त्यावर आल्याने हा रस्ता बंद झाला आहे. सकाळी गडावर जाणाऱ्या नागरिकांना या मार्गावर दरड कोसळल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती वनविभाग आणि प्रशासनाला दिली. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून वनव्यवस्थापन समितीतर्फे दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जेसिबीच्या साह्याने दरड हटवली जात असून हा रस्ता बंद करण्यात आला आहे.
पुण्यात नागरिक पर्यटनासाठी सिंहगडाला जास्त पसंती देतात. दर शनिवार - रविवार सिंहगडावर असंख्य पर्यटक दाखल होतात. पण मध्यंतरीच्या काळात पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाने सिंहगडाच्या वाटेवर दरड कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर पर्यटकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. परंतु पर्यटन सुरूच ठेवले होते. मात्र आता पुन्हा दरड कोसळल्याने प्रशासनाने सिंहगड पर्यटन पुढील काही दिवसांसाठी बंद ठेवले आहे.