गुन्हा गंभीर, आरोपींना जामीन दिल्यास समाजात चुकीचा संदेश; पोर्शे प्रकरणातील आरोपींचे जामीन फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 12:49 PM2024-08-23T12:49:31+5:302024-08-23T12:52:27+5:30

गुन्हा गंभीर असून आरोपींना जामीन दिल्यास पुन्हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो

The crime is serious giving bail to the accused will send a wrong message to the society; Accused in Porsche case denied bail | गुन्हा गंभीर, आरोपींना जामीन दिल्यास समाजात चुकीचा संदेश; पोर्शे प्रकरणातील आरोपींचे जामीन फेटाळले

गुन्हा गंभीर, आरोपींना जामीन दिल्यास समाजात चुकीचा संदेश; पोर्शे प्रकरणातील आरोपींचे जामीन फेटाळले

पुणे: पोर्शे कार अपघातात मृत्यू झालेल्या दोन अभियंता तरुणांचे रस्त्यावरील रक्त सुकलेही नव्हते. त्यापूर्वीच आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी साक्षीदारांचे जबाब रेकॉर्डवर घेतले आहेत, त्यांना फितूर केले जाऊ शकते. पूर्वीही आरोपींनी पुराव्यात छेडछाड केली आहे. आरोपींना जामीन दिल्यास पुन्हा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, आरोपींना जामीन दिल्यास समाजात चुकीचा संदेश पोहोचू शकतो, अशी निरीक्षणे नोंदवित विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी या गुन्ह्यातील सर्व आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्या प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये या प्रकरणात मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल, आई शिवानी विशाल अगरवाल (दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड येरवडा कारागृहात आहेत. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर न्यायालयाने गुरुवारी (दि. २२) निकाल दिला. याबाबत न्यायाधीश मुधोळकर यांनी ४५ पानांची जामीन ऑर्डर केली असून, त्यात गुन्ह्याच्या संदर्भातील विविध निरीक्षणं नोंदविली आहेत. विशाल आणि शिवानी अग्रवाल हे दोघे समाजातील आर्थिकदृष्ट्या प्रभावशाली व्यक्ती आहेत. डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यासह इतर आरोपींवर दबाव टाकून रक्ताचे नमुने बदलण्यात दोघे यशस्वी ठरले. त्यांना जामीन मिळाला तर ते साक्षीदारांना देखील फितूर करण्याची शक्यता आहे, असे न्यायाधीशांनी आदेशात नमूद केले आहे. दरम्यान, अपघातातील पोर्शे कार परत मिळण्यासाठी अग्रवाल कुटुंबीयांनी बाल न्याय मंडळात (जेजेबी) अर्ज केला आहे. या अर्जावर २८ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.

पाहिजे असलेल्या आरोपीचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

अल्पवयीन कारचालक मुलासोबत कारमध्ये नशेत असलेल्या त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आणखी दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. आदित्य अविनाश सूद (वय ५२, रा. सोपान सोसायटी, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) आणि आशिष सतीश मित्तल (वय ३७, रा. स्काय वेलवेडर सोसायटी, विमाननगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर अरुणकुमार देवनाथ सिंग (४७, रा. विमाननगर) याचा पोलिस शोध घेत होते. दरम्यान सिंग याने या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी ॲड. आबिद मुलाणी यांच्यामार्फत अर्ज केला आहे. त्यावर युक्तिवाद करताना ॲड. मुलाणी म्हणाले, सिंग याचा मुलगा या गुन्ह्यात आरोपी नाही. तो कारमध्ये मागील सीटवर बसला होता. सिंग यांनी रक्ताचा नमुना कुणालाही दिलेला नाही. पोलिसांनी पाठविलेल्या नोटीसला देखील त्यांनी प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, पाहिजे आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या (दि. २३) निकाल लागण्याची शक्यता आहे.

Web Title: The crime is serious giving bail to the accused will send a wrong message to the society; Accused in Porsche case denied bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.