Narendra Dabholkar Case: जिवंत असेल म्हणून रॉंग साईडने गाडी पळवित गेलो, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 09:27 PM2022-04-12T21:27:33+5:302022-04-12T21:28:13+5:30
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या मनपा कर्मचाऱ्याची उलटतपासणी पूर्ण
पुणे: जेव्हा डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली, तेव्हा तीन गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकल्यानंतर त्या दिशेने पळालो असल्याचे आधीच साक्षीदाराने सांगितले होते. त्यावर बचाव पक्षातर्फे साक्षीदाराला नकाशा दाखविण्यात आला. तेव्हा तू कुठे होतास? गाडी कुठे लावली होती. घटनास्थळी कसा गेलास? रॉंग साईडने गेलास का? अशी विचारणा झाल्यानंतर साक्षीदार ‘हो’ म्हणाला. व्यक्ती जिवंत असेल म्हणून मदत करायला गेलो; पण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहिल्यानंतर निघून गेलो...असे प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने उलटतपासणीत सांगितले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची उलटतपासणी मंगळवारी पूर्ण झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ एप्रिल रोजी होणार असून, डॉ. दाभोलकर यांचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरची साक्ष आणि उलटतपासणी त्यावेळी नोंदविण्यात येणार आहे.
विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात 'सनातन' संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर यांच्याविरोधात कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्यांच्यासह ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे अशा पाच आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. या घटनेचा साक्षीदार असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्याची मार्च महिन्यात साक्ष नोंदविण्यात आली होती. डॉ. दाभोलकर यांच्यावर अंदुरे आणि कळसकर यांनी गोळीबार केला आणि त्यानंतर दोघे तेथून फरार झाले, अशी साक्ष या कर्मचाऱ्याने नोंदवली होती. त्यावर बचाव पक्षातर्फे ॲड. प्रकाश साळसिंगीकर, ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि ॲड. सुवर्णा आव्हाड-वस्त यांनी गेल्या तीन सुनावण्यांमध्ये या साक्षीदाराची उलटतपासणी घेतली. डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आतापर्यंत सहा साक्षीदार न्यायालयासमोर सादर केले आहेत.