आताचे सरकार नशा केलेले, फडणवीस हे त्यांचे सरदार; संजय राऊतांची घणाघाती टीका
By राजू इनामदार | Published: April 26, 2023 03:34 PM2023-04-26T15:34:37+5:302023-04-26T15:34:56+5:30
सरकार लफंग्यांना पाठीशी घालणारे सरकार असून विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरूंगात टाकण्याचा प्रकार सुरू
पुणे: आम्हाला नशा केलेले पैलवान म्हणतात, पण हे सरकारच नशा केलेले सरकार आहे व त्यांचे सरदार देवेंद्र फडणवीस आहेत अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली. मंत्री दादा भुसे यांच्या प्रकरणात पुरावे दिलेत त्याची चौकशी फडणवीसांनी करावी अशी मागणीही त्यांनी केली.
दौंड मधील साखर कारखान्याच्या विरोधात शेतकरी क्रुती समितीने आयोजित केलेल्या सभेस जाण्यासाठी राऊत पुण्यात आले होते. डेक्कनवर एका ऊपहारग्रुहाच्या लॉबीत त्यांनी पत्रकाराबरोबर संवाद साधला. राऊत म्हणाले, फडणवीस सगळीकडे सांगतात की ते ग्रुहमंत्री झाले म्हणून काहीजणांची अडचण झाली. पण ज्यांची अडचण होणार होती ते तर त्यांच्या जवळच आहेत. ते म्हणतात, सरदारच आमचा आहे, आम्हाला काही होणार नाही. नशा सरकारने केली आहे, आम्ही नाही.
दोन मंत्र्यांची प्रकरणे पुराव्यानिशी फडणवीसांकडे दिली आहेत असे सांगून फडणवीस म्हणाले, कितीतरी वेळा मागणी केली चौकशीची. वेळ नाही म्हणतात. दादा भुसे यांनी गिरनार कारखान्यासाठी म्हणून १०० कोटी जमा केले. त्याचे काय झाले विचारायचे नाही का? दौंड कारखान्याचा ऑडिट रिपोर्ट त्यांना दिला. ५०० कोटीचा घोटाळा आहे. चौकशी करणार की नाही. हे सरकार लफंग्यांना पाठीशी घालणारे सरकार आहे. विरोधी पक्षाचे नेते तुरूंगात टाकण्याचा प्रकार सुरू आहे.
मला दौंडला जाऊ देत नाहीत. १४४कलम लावले। पोलिस बंदोबस्त बोलावला. दौंडचा कारखाना पाकिस्तानात आहे का? यांना कशाची इतकी भीती वाटते असा प्रश्न राऊत यांनी केला. शरद.पवार यांच्याबरोबरच्या बैठकीत ऊद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला हे खोटे आहे. मी स्वतः बैठकीत होतो. त्यामुळे ही अफवा आहे असे ठामपणे सांगतो व अफवा पसरवणे गुन्हा आहे, हे माध्यमांनीही लक्षात घ्यावे असा इशारा राऊत यांनी दिला. अजीत पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून होर्डिंग्ज लागले असतील तर लागू द्या, ज्याच्यामागे १४५ जण आहेत तो कोणीही मुख्यमंत्री होईल. तसे वाटण्यात गैर काही नाही असे राऊत म्हणाले. शहर प्रमूख संजय मोरे,गजानन थरकुडे राऊत यांच्यासमवेत होते.