Pune: प्लस व्हॅलीतील कुंडात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 07:59 PM2023-12-13T19:59:41+5:302023-12-13T20:00:30+5:30
१२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पौड पोलिस स्टेशनमधील लोणावळ्यातील शिवदुर्ग टीमला रेस्क्यूकरिता मदतीचा फोन आला होता...
लोणावळा (पुणे) : ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथील एका कुंडात बुडालेल्या २१ वर्षीय मुलाचा मृतदेह शोधून तो बाहेर काढण्यात लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्कू पथक इतर टीमला यश आले आहे. १२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पौड पोलिस स्टेशनमधील लोणावळ्यातील शिवदुर्ग टीमला रेस्क्यूकरिता मदतीचा फोन आला होता. घटनेची माहिती समजताच शिवदुर्ग टीमने साहित्याची जुळवाजुळव करत ताम्हिणी घाट गाठला. त्याठिकाणी मित्रांसोबत फिरायला आलेला २१ वर्षीय तरुण रोहन विरेश लोणी (वय २१, मूळचा राहणार सोलापूर, सध्या शिक्षणानिमित्त राहणार पुणे) हा पाण्यात बुडाल्याची माहिती समजली.
मित्रांबरोबर ताम्हिणी घाटात प्लस व्हॅली येथे तो फिरायला आला होता. अवघड ठिकाणी खाली उतरून पाण्याच्या कुंडात ही मुले पोहायला उतरली व त्यातील रोहन बुडाला होता. प्लस व्हॅली येथे जाण्यासाठी बरीच पायपीट करावी लागते. मोठमोठे दगडगोटे, तीव्र उतार, अशा ठिकाणी जाणे- येणे किंवा फोटो काढणे सोपे आहे; पण एखाद्या जखमी किंवा मृत व्यक्तीला बाहेर घेऊन येणे फार कठीण आहे. दुपारी ४:३० वाजता शिवदुर्ग टीम घटनास्थळी पोहोचली.
आपत्ती व्यवस्थापन संस्था मुळशीचे प्रमोद बलकवडे, पौड पोलिस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, वनखात्याचे कर्मचारी, अभयारण्य अधिकारी यांनी याकरिता मोलाचे सहकार्य केले. या शोधमोहिमेत शिवदुर्गचे सचिन गायकवाड, महेश मसने, दिव्येश मुनी, अशोक उंबरे, सुनील गायकवाड, योगेश उंबरे, प्रिन्स बैठा, सागर कुंभार, योगेश दळवी, दुर्वेश साठे, अनिल आंद्रे, रमेश कुंभार हे सहभागी झाले होते.