पुस्तकांचा वाद थांबेना; ’फ्रँक्चर्ड फ्रीडम’ नंतर ‘उत्क्रांती : एक वैज्ञानिक अंधश्रद्धा' यावरून वादाला तोंड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 04:42 PM2022-12-19T16:42:10+5:302022-12-19T16:43:05+5:30
प्रदीप रावत यांचा ‘उत्क्रांती : एक वैज्ञानिक अंधश्रद्धा' पुस्तकावर आक्षेप; लेखक डॉ. अरूण गद्रे यांचे समारोसमोर चर्चा करण्याचे आवाहन
पुणे : ’फ्रँक्चर्ड फ्रीडम’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या अनुवादित केलेल्या पुस्तकाला जाहीर केलेला पुरस्कार राज्य शासनाने रदद केल्यानंतर आता डॉ. अरूण गद्रे यांच्या ‘उत्क्रांती : एक वैज्ञानिक अंधश्रद्धा' या पुस्तकावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. भारतीय इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष व माजी खासदार प्रदीप रावत यांनी गद्रे यांच्या पुस्तकाला घोषित केलेल्या पुरस्कारावर आक्षेप घेत पत्राद्वारे हा पुरस्कार मागे घेण्याची विनंती शासनाला केली आहे. त्यावर रावत यांची विरोधाची पद्धत ही केवळ एक त्यांची भावनिक प्रतिक्रिया आहे, हा शास्त्रीय प्रतिवाद नाही, असे उत्तर गद्रे यांनी देत या पुस्तकावर समोरासमोर चर्चा करण्याचे आव्हान रावत यांना दिले आहे.
डॉ. अरूण गद्रे यांच्या ‘उत्क्रांती : एक वैज्ञानिक अंधश्रद्धा' या पुस्तकाला राज्य शासनाचा महात्मा ज्योतीराव फुले पुरस्कार जाहीर झाला आहे, मात्र, अवैज्ञानिक आणि निव्वळ धर्मश्रद्धेवर बेतलेल्या युक्तीवादाला विज्ञान समजणे आणि त्याला वैज्ञानिक पुस्तक म्हणून पुरस्कार जाहीर करणे हा तद्दन अडाणी मूर्खपणा आहे. सावरकरांसारख्या विज्ञाननिष्ठ प्रणेत्याचा वारसा सांगणा-या सरकारने असा विज्ञानाला हिणविणारा, वाकुल्या दाखवणा-या भ्रामक युक्तीवादाला विज्ञानाची प्रतिष्ठा द्यावी हे सरकारला शोभणारे नाही असे पत्रामध्ये रावत यांनी नमूद केले आहे. रावत यांच्या पत्राची दखल घेत गद्रे यांनी घेतली आहे. रावत यांनी चुकीच्या पायावर का होईना; एक चांगली सुरुवात केली आहे, ती या पुस्तकाच्या चर्चेची आहे आणि प्रदीप रावत यांच्याशी किंवा इतरांशी मी समोरासमोर वाद घालण्यासाठी कधीही तयार आहे. नव्हे मला माझे कोणते पुरावे चुकीचे आहेत ते समजून घ्यायला आवडेल. कारण परत तेच. वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे पुरावे जिथे बोट दाखवतात तिथे जाणे, मग आपल्याला आवडो वा न आवडो, असे प्रत्युत्तर डॉ. गद्रे यांनी रावत यांना दिले आहे.
माझे हे पुस्तक एक निष्ठूर वैज्ञानिक पुस्तक
पुस्तकातील उत्क्रांतीविरोध हा ख्रिश्चन धर्माशी जोडून प्रदीप रावत गंभीर चूक करत आहेत. माझे हे पुस्तक एक निष्ठूर वैज्ञानिक पुस्तक आहे. त्याने उत्क्रांतीच्या प्रदीप रावतांसारख्या प्रामाणिक अभ्यासू समर्थकाना जोरदार धक्का बसला तर मी समजून घेऊ शकतो.- डॉ. अरूण गद्रे, लेखक
पुस्तकाची निवड विज्ञान विषयक साहित्यासाठी कशी केली जाते?
विज्ञान विरोधी पुस्तकाला विज्ञानविषयक पुरस्कार हा काय प्रकार आहे ? सरकार कोणाचेही असो, राज्य साहित्य व संस्कृती मंडळाची कार्यपद्धती बदलण्याची गरज आहे. मी धर्मातील विचारानुसार लेखन केले, असे संबंधित लेखकाने मला चर्चेदरम्यान सांगितले. त्यांनी लेखन केले इथपर्यंत ठीक आहे; पण त्या पुस्तकाची निवड विज्ञान विषयक साहित्यासाठी कशी केली जाते? असेच पुस्तक हिंदुत्ववादी विचाराच्या माणसाने लिहून विज्ञानाला अंधश्रद्धा ठरवले तरी माझी भूमिका हीच राहील - प्रदीप रावत, माजी खासदार