Neelam Gorhe: "गेलेले एकत्र येतील अन् नदीचा प्रवाह पुन्हा सुरु होईल..." नीलम गोऱ्हे यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 06:36 PM2022-07-17T18:36:09+5:302022-07-17T18:36:29+5:30
राजकारणात वेगवेगळ्या पद्धतीनं वाद सुरु झाले आहेत
पुणे : राजकारणात वेगवेगळ्या पद्धतीनं वाद सुरु झाले आहेत. शिवसेनेतून अनेक माणसे निघून चालली आहेत. पण आम्ही गेलेल्या लोकांचा शोक करत बसणार नाही. काही दिवसांनी ते एकत्र येतील आणि नदीचा प्रवाह पुन्हा सुरु होईल. असे मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे.
पुण्यात प्रभाग क्रमांक १० येथे विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यचा वाटपचा कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक राजू पवार यांनी केले होते. यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे आणि आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर गोऱ्हे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील होऊ लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेला वारंवार धक्के बसू लागले आहेत. आमदार यांच्या पाठोपाठ नगरसेवक, जिल्हाप्रमुख, शाखा अध्यक्ष शिंदे गटात प्रवेश लागले आहेत. या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना गोऱ्हे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेनेचे २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण आहे तेच आमचं चालले आहे. राजकारणाचा आवाका खूप मोठा झाला आहे. कारण वेगवेगळ्या पद्धतीने वाद सुरु झाले आहेत. मी एक भगवत गीतेवर विश्वास ठेवणारी नास्तिक आहे. त्यामुळे जे गेलेले आहेत त्यांचा शोक करत बसणार नाही. काही दिवसांनी ते पुन्हा एकत्र येतील अन् नदीचा प्रवाह सुरु होईल. मंत्रमंडळाच्या विस्ताराबाबत बोलायचं झालं तर, सरकारला शक्य होईल तेव्हा त्यांनी विस्तार करावा.
सरकारने जनतेच्या बहुमताचा विचार करावा
संभाजीनगर आणि धाराशिव या नामांतराबाबत गोऱ्हे म्हणाल्या, आता असं दिसतंय कि, कायदा नक्की तो काय आहे हे सर्वोच्च न्यायालय सांगत असते. पण आम्ही सांगतो तो कायदा असा अविर्भाव कोणी घेतला तो जास्त काळ टिकत नाही. असे माझ्या अनुभवाचे बोल आहे. त्यामुळे संभाजी नगर अथवा धाराशिव यांच्या नामांतराबाबत अल्पमत आणि बहुमताचा विचार करयाचा नसतो जनतेच्या बहुमताचा विचार करावा असे मला वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.