पर्वतीवरील बाजीराव पेशवेंच्या स्मारकाच्या विकासाचे काम समाधानकारक; चंद्रकांत पाटलांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:12 IST2025-01-10T16:12:14+5:302025-01-10T16:12:57+5:30
पर्वती टेकडीवरील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासह; भारताचा उज्ज्वल इतिहास आणि पेशवे कालीन इतिहासावर आधारित भित्तीचित्रे साकारण्यात येत आहेत

पर्वतीवरील बाजीराव पेशवेंच्या स्मारकाच्या विकासाचे काम समाधानकारक; चंद्रकांत पाटलांची माहिती
पुणे : पुण्यातील पर्वती टेकडीवरील श्रीमंत बाजीराव पेशवे आणि नानासाहेब पेशवे स्मारकाच्या विकासाचे काम समाधानकारक झाले असून, पहिल्या टप्प्यातील विकासकामांचे लोकार्पण केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पुण्यातील पर्वती टेकडीवर बाजीराव पेशवे स्मारक आणि नानासाहेब पेशवे संग्रहालयाचा विकास व्हावा; यासाठी चंद्रकांत पाटील आग्रही असून, जिल्हा नियोजन, आमदार निधी आणि लोकसहभागातून विकास करण्यात येत आहे. यामध्ये पर्वती टेकडीवरील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासह; भारताचा उज्ज्वल इतिहास आणि पेशवे कालीन इतिहासावर आधारित भित्तीचित्रे साकारण्यात येत आहेत. पाटील यांनी या सर्व कामाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी भाजप प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवे, देवदेवेश्वर संस्थेचे रमेश भागवत, शिल्पकार विवेक खटावकर आदी उपस्थित होते.
या पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, पर्वती टेकडीच्या विकासाचा विषय आठ महिन्यांपूर्वी समोर आला होता. श्रीमंत बाजीराव पेशवे स्मारक आणि नानासाहेब पेशवे स्मारक परिसराच्या सुशोभीकरणासाठी सादरीकरण देखील झाले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील कामांसाठी पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात जिल्हा नियोजन आणि स्थानिक आमदार माधुरी मिसाळ यांच्या आमदार निधीतून भरीव निधी उपलब्ध करून दिला होता. यातील काही कामे शासनाच्या नियमात बसत नसल्याने सीएसआर निधीतून ती पूर्ण करण्यात आली. ही सर्व कामे अतिशय उत्तम दर्जाची झाली आहेत. पहिल्या टप्प्यातील कामाचे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते लोकार्पण व्हावे, असा प्रयत्न आहे. पुढील टप्प्यांचे काम देखील लवकरच सुरू करणार असून; कामांची यादी तयार करून सादर करण्याच्या सूचना देवदेवेश्वर संस्थान आणि स्मारक विकास समितीला केली आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.