चाकण-शिक्रापूर मार्गालगतचे ढाबेच बनले अनधिकृत धंद्यांच्या तस्करींचे अड्डे; पोलिसांचे अभय, नागरिक संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 03:39 PM2024-05-23T15:39:00+5:302024-05-23T15:40:01+5:30
पार्किंगच्या काळोख्या अंधारात डिझेल, पेट्रोल व गॅस चोरीच्या घटना बळावत चालल्या असून, हेच ढाबे अनधिकृत धंद्यांच्या तस्करींचे अड्डे बनू लागले आहेत....
- भानुदास पऱ्हाड
शेलपिंपळगाव (पुणे) :चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गावरील अनेक ढाबे, हॉटेल्स व मोकळ्या जागा परप्रांतीय व्यावसायिकांनी स्थानिकांकडून मासिक भाडेतत्त्वावर चालवायला घेतल्या आहेत. मात्र, अशा ढाब्यांवर जेवणाऱ्यांपेक्षा 'पे पार्किंग' करून मुक्कामासाठी थांबणाऱ्यांची संख्या जास्त आहे. वास्तविक परप्रांतीय व्यावसायिकांनी पार्किंगचा हा धंदाच मांडला आहे. मात्र, पार्किंगच्या काळोख्या अंधारात डिझेल, पेट्रोल व गॅस चोरीच्या घटना बळावत चालल्या असून, हेच ढाबे अनधिकृत धंद्यांच्या तस्करींचे अड्डे बनू लागले आहेत.
शेलपिंपळगाव (ता. खेड) हद्दीतील मोहितेवाडी येथे एका राजस्थानी हॉटेलच्या पार्किंग आवारात उभ्या असलेल्या टँकरमधून अनधिकृतपणे गॅस चोरी करताना भीषण स्फोटाची दुर्घटना घडली. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या स्फोटाच्या दुर्घटनेची दाहकता इतक्या मोठ्या प्रमाणात होती की लगतच्या घरांचे पत्रे, खिडक्यांच्या काचा फुटल्या तसेच भिंतींना तडे गेले तसेच आसपासच्या ५५ घरांचे नुकसान झाले, तर पाचशे मीटर अंतरातील फळझाडे व वृक्ष आगीच्या ज्वाळांचे भक्ष्य झाले. सुदैवाने एकापाठोपाठ स्फोट झाल्याने स्थानिकांना पळ काढता आला. मात्र, आग लागताच हा स्फोट झाला असता तर काय झाले असते? याची कल्पनाच न केलेली बरी. स्थानिक नागरिकांचे नशीब बलवत्तर म्हणून अनेकांचे जीव वाचले आहेत.
चाकण-शिक्रापूर राज्यमहार्गावर अनेक परप्रांतीय व्यावसायिकांनी ढाबे व हॉटेल्सच्या माध्यमातून आपले बस्तान बसवले आहे. रात्रीच्या वेळी ढाब्याच्या आवारात संबंधित वाहन पार्किंग करण्यासाठी टायरनुसार १०० ते ३०० रुपये आकारले जातात. यामध्ये वाहनाला रात्रीची सिक्युरिटीही पुरवली जाते. त्यामुळे या भागातील ढाब्यांवर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या असतात. यापूर्वी राज्य महामार्गावर इंधन चोरीच्या घटना उघड झाल्या असतानाही संबंधित विभाग ''अलर्ट'' झालेला नाही. पोलिस प्रशासनही परिसरातील अवैध धंदे बंद करण्यात सपशेल अपयशी ठरत आहे. विशेषतः ''दोन नंबरचे'' सर्व धंदे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्याच आशीर्वादाने सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. मोहितेवाडीतील दुर्घटनेनंतर तरी पोलिस प्रशासन नियमावली तोडून अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळेल अशीच अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहे.
जागामालक सावध व्हा...
रस्त्यालगतचे अनेकजण आपले हॉटेल, ढाबे किंवा मोकळी जागा इतरांना भाड्याने देतात. मात्र आपल्या जागेत रात्रीच्या वेळी काय धंदे होतात हे अनेक मूळ मालकांना समजत नाही. मात्र, एखादी घटना उघड झाल्यानंतर कसलीही चूक नसतानादेखील मूळ जागामालकाला दोषी ठरवले जाते. त्यामुळे आपली जागा इतरांना भाड्याने देताना कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून दक्ष राहणे आवश्यक आहे.
आमची उपजीविका चालावी म्हणून हॉटेल, ढाबे किंवा जागा भाड्याने देतो. यावेळी आम्ही आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता केलेली असते. रीतसर चलन भरून ॲग्रिमेंट केलेले असते. मात्र, भाडेकरूच्या चुकीच्या गोष्टींची शिक्षा पोलिसांनी जागामालकाला करणे चुकीचे आहे.
- अमित मोहिते, हॉटेल जागामालक
शेलपिंपळगाव - मोहितेवाडी मधील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपल्या आजूबाजूला कोणतेही अवैद्य धंदे सुरू असतील तर कळवा. पोलिस प्रशासन हे सर्व धंदे बंद करतील. ग्रामपंचायत हद्दीत यापुढे अवैध धंदे आढळून आले तर योग्य ती कारवाई केली जाईल.
- शरद मोहिते, सरपंच शेलपिंपळगाव.