जिल्ह्याचा पुढील पाच वर्षांचा शेतीचा आराखडा होणार;कृषी विभाग १५ दिवसांत करणार आराखडा
By नितीन चौधरी | Updated: March 6, 2025 19:45 IST2025-03-06T19:45:25+5:302025-03-06T19:45:42+5:30
पुणे, मुंबईसारखी बाजारपेठ आंतरराष्ट्रीय विमानतळ या कारणांमुळे शेतमालाला निर्यातीसाठी मोठी संधी आहे.

जिल्ह्याचा पुढील पाच वर्षांचा शेतीचा आराखडा होणार;कृषी विभाग १५ दिवसांत करणार आराखडा
पुणे कृषिक्षेत्रात आघाडीवर असलेल्या पुणे जिल्ह्यात आगामी पाच वर्षांत उत्पादनवाढीसह निर्यातीवरही भर दिला जाणार आहे. त्यासाठी सर्वंकष आराखडा येत्या पंधरा दिवसांत तयार केला जाणार आहे. हा आराखडा तयार करताना शेतकरी, संशोधन संस्था तसेच कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची मते अंतर्भूत केली जाणार आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला आहे.
जिल्ह्यात फुलशेतीसह फळबागांखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहेत. पुणे, मुंबईसारखी बाजारपेठ आंतरराष्ट्रीय विमानतळ या कारणांमुळे शेतमालाला निर्यातीसाठी मोठी संधी आहे. केवळ निर्यातच नव्हे, तर देशांतर्गत बाजारपेठही पुण्यातून मोठ्या प्रमाणावर अंतर्गत वाहतूक केली जाते. मात्र, त्यात सुसूत्रता आणण्यासाठी धोरणात काही बदल करणे गरजेचे आहे. हे लक्षात आल्यानंतर डुडी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभाग, प्रगतिशील शेतकरी, बिगरसरकारी संस्थांचे प्रतिनिधी व जिल्ह्यातील संशोधन संस्थांमधील शास्त्रज्ञांची एकत्रित बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली. पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, प्रगतिशील शेतकरी सोपान कांचन, समीर डोळे, जितेंद्र बिडवई, सुनील भगत, भरत शिंदे, मुकुंद ठाकर तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाट, सुनील जाधव, तुळशीराम चौधरी उपस्थित होते.
डुडी म्हणाले, जिल्ह्यात व्यावसायिक तत्त्वावर मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. त्यातून फुले तसेच फळांचीदेखील निर्यात होत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत बाजारपेठेत नेमके काय हवे आहे. याचा अभ्यास करून त्यानुसार जिल्ह्यात लागवड होणे गरजेचे आहे. शेतकरी व अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचा पुढील पाच वर्षांसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. यासाठी कृषी विभागाला आराखडा तयार करण्यासाठी सांगण्यात आले आहे.
यावेळी डुडी यांनी जिल्ह्यात निर्यातीसह सेंद्रिय शेती यावरही भर देण्याचे निर्देश दिले. यावेळी फूल उत्पादक शेतकऱ्यांनी फुलांच्या वाहतुकीसाठी आवश्यक असणाऱ्या कोल्ड चेनची पायाभूत सुविधा निर्माण करावी, अशी मागणी केली. काही शेतकऱ्यांनी निर्यात तसेच आयातीसंदर्भात शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, अशी मागणीही केली.
जिल्ह्याचा शेतीक्षेत्राचा पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार बैठकीत आलेल्या सूचनांचा तसेच तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसांत आराखडा तयार करण्यात येईल. - संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी