साधारण नाराजी जाहीर व्यक्त न करणे हीच पक्षाची शिकवण; मेधा कुलकर्णींच्या पोस्टवर भाजप नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 09:31 AM2023-08-14T09:31:43+5:302023-08-14T09:32:48+5:30
साधे हँडबिलवर फोटो नाही हा कुलकर्णी यांचा आक्षेप होता, पण याचवेळी शहरात २४० हॉर्डिंग्सवर यांचे फोटो होते
पुणे : भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष, कोथरूडच्या माजी आमदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी एनडीए (चांदणी) चौकाच्या उद्घाटन कार्यक्रमाबद्दल फेसबुक पोस्ट लिहून असंताेष व्यक्त केला हाेता. त्यावरून कोथरूड भाजपमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मेधा कुलकर्णी पक्षाची शिस्त मोडत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू असून, भाजपचे कोथरूड अध्यक्ष पुनीत जोशी यांनीही कुलकर्णी यांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
पश्चिम पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या एनडीए चौकाचे १२ ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्ट लिहून चांदणी चौकाच्या उद्घाटन कार्यक्रमावरून पक्षावर टीका केली. साधे हँडबिलवर फोटो नाही हा त्यांचा आक्षेप होता; पण याचवेळी शहरात २४० हॉर्डिंग्सवर यांचे फोटो होते, जाहिरातीत त्यांचे फोटो होते, असे जाेशी म्हणाले.
साधारण नाराजी असेल तर ती अशी जाहीर व्यक्त करायची नसते, ही पक्षाने आम्हाला दिलेली शिकवण आहे. पक्ष आधी नंतर आपण हे आपल्या पक्षाचे विचार आहेत. ऐन कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी तुम्ही असे व्यक्त होणे एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनाला पटले नाही, असे पुनीत जोशी म्हणाले.