अमेरिकेला जायचं स्वप्नही भंगलं; अनिशच्या जाण्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर, अनिशचा मित्र अकिबच्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 03:59 PM2024-05-21T15:59:30+5:302024-05-21T16:01:58+5:30
अनिश अश्विनी आम्ही एकत्र पबमधे गेलो होतो, पण पुढे असं काही घडलं कि तो प्रसंग अजूनही डोळ्यासमोरून जात नाही
पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन पोराने शनिवारी मध्यरात्री बेदरकारपणे आलिशान कार चालवत दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोश्टा या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अल्पवयीन कारचालकाला नागरिकांनी पकडून चांगला चोप दिला होता. त्यानंतर त्याला पोलिसाच्या हवाली करण्यात आले. पुणेपोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून कोर्टात हजरही केलं होतं. मात्र कोर्टाने काही अटी शर्ती घालून देत त्याला लगेच जामीनही दिला. त्यामुळे अनेक सवाल उपस्थित होऊ लागले.
अखेर पोलिसांवर ताशेरे ओढण्यास सुरुवात झाल्यावर वडिलांना आणि मुलाला ताब्यात घेण्यात आले. तर बार मालक, गाडीमालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेबाबत अनिशचा मित्र अकिबने माध्यमांशी संवाद साधला. माझ्या डोळ्यासमोरून अजूनही तो प्रसंग जात नाही अशी आपभीती त्याने सांगितली आहे.
अनिश खूप समजूतदार होता. त्याच्या जाण्याने माझं खूप नुकसान झालं आहे. त्याच्या कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळल्याचे तो म्हणाला. अनिश आणि मी एकाच वर्गात होतो. आम्ही एकत्र इंजिनिअरिंग केलं आहे. तसंच आम्ही एकाच वयाचे असल्याने आमच्यात पटकन मैत्री झाली होती. अनिश विमान नगर या ठिकाणी एका घरात भाडे तत्वावर राहात होता. त्याला फारसे मित्र नव्हते. तो त्याच्या लहान भावासह त्या घरात राहात होता. आम्हीच त्याचे जवळचे मित्र होतो.
अकिब म्हणाला, अनिश आणि अश्विनी यांच्यासह आम्ही सगळे पबमध्ये गेलो होतो. कल्याणी नगर भागात त्या रेस्टोरंट होतं. आम्ही तिथेच गेलो. पुढे काय घडणार आहे ते आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही सगळे घरी जाण्यासाठी बाहेर आलो. तितक्यात डोळ्यासमोर एक भीषण अपघात घडला. माझ्या डोळ्यांसमोरून अजूनही तो प्रसंग जात नाही असंही अकीबने सांगितले.
अनिश हा मूळचा मध्यप्रदेशाचा असून त्याने डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग महाविद्यालयातून इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर तो एका कंपनीत एंटर्नशीप करत होता. तिथेच त्याची आणि अश्विनीसोबत ओळख झाली. ते दोघे चांगले मित्रही झाले. अनिश हा खूप हुशार विद्यार्थी होता. त्याला पुढील शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेला जायचं होतं ते त्याचं स्वप्न होतं. आम्ही जेव्हा भेटायचो तेव्हा कोडिंगविषयी चर्चा करायचो. एक मित्र म्हणूनही अनिश खूप चांगला माणूस होता. अशीही माहिती अकिबने दिली.