Pradhan Mantri Awas Yojana: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे घरांचे स्वप्न साकार होणार; पुण्यातील नागरिकांना 'या' भागात मिळणार घरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 10:49 IST2025-01-08T10:48:51+5:302025-01-08T10:49:24+5:30
पंतप्रधान दिवस योजनेतून ३०० चौरस फुटाचे घर मिळणार असून नोंदणीसाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, उत्पन्नाचा दाखल, जातीचा दाखला लागणार आहे

Pradhan Mantri Awas Yojana: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे घरांचे स्वप्न साकार होणार; पुण्यातील नागरिकांना 'या' भागात मिळणार घरे
पुणे : महापालिकेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून पुणे महापालिका धानोरी, हडपसर, बाणेर, कोंढवा, बालेवाडी, वडगाव खुर्द या पाच भागांत ४ हजार १७३ घरे बांधणार आहे. त्यासाठी पुणे महापालिका ३०० कोटी रुपये खर्च करणार आहे.
शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना कमी खर्चात हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात पुणे महापालिकेने वडगाव बुद्रुक, खराडी तसेच हडपसर भागात यापूर्वी २ हजार ९१८ घरे बांधून त्या प्रदान केल्या आहेत. महापालिकेने या माध्यमातुन नागरिकांच्या हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यानंतर सप्टेंबर २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान आवास योजना ०.२’ ची घोषणा केली. त्यानंतर राज्य सरकारने आदेश काढत या योजनेसाठी नागरिकांची घरांसाठी नोंदणी करण्याच्या सूचना महापालिकेला केली. मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने ही प्रक्रिया रखडली होती. मात्र, आता महापालिकेने नागरिकांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाईन पद्धतीने ही नोंदणी करता येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात धानाेरी, हडपसर, कोंढवा, बालेवाडी, वडगाव खुर्द, बालेवाडी येथे ही घरे उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी ४ हजार १७६ घरे बांधण्यासाठी पालिकेला ३०० कोटी रुपये खर्च येणार आहे. या योजनेतुन ३०० चौरस फुटाचे घर मिळणार आहे. त्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, उत्पन्नाचा दाखल, जातीचा दाखला लागणार आहे.
पुणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे म्हणाले, पंतप्रधान आवास योजनेत महापालिकेच्या जागेवर घर बांधल्याने जमिनीचा खर्च नाही. त्यामुळे कमी दरात घरे देणे शक्य होते. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांचे या योजनेतून घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यासाठी इच्छुक नागरिकांची नोंदणी महापालिकेने सुरू केली आहे.