ससूनच्या खिडकीत बसून ड्रग माफिया ओढायचा सिगारेट; गर्लफ्रेंडसोबत ललित पाटीलचे फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 06:35 AM2023-10-20T06:35:33+5:302023-10-20T06:35:51+5:30
पंचतारांकित हॉटेलमध्ये मैत्रिणीसोबत फोटोसेशन
- नितीश गोवंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील हा केवळ न्यायालयात दाखवण्यासाठी कैदी होता व ससूनला त्याने अय्याशीचा अड्डा बनविला होता. त्याचे ससून रुग्णालयाच्या खिडकीत बसून सिगारेट ओढतानाचे फोटो समोर आल्यानंतर या सर्व बाबींना पुष्टी मिळाली आहे. मुंबई पोलिसांना चौकशीदरम्यान ललितने रुग्णालयातील कर्मचारी आणि पोलिसांना पैसे देऊन मॅनेज करत असल्याचे सांगितल्याने, ललित ससूनमधील त्याचा मुक्काम डॉक्टरांना पैसे देऊन वाढवत असल्याची माहितीही समोर आली आहे.
रुग्णालयापासून जवळच असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याची प्रेयसी प्रज्ञा कांबळेसोबत तो रोमान्स करत असतानाचेही फोटोतून स्पष्ट होत आहे. ललित हॉटेलसह मॉलमध्ये खरेदी करतानाचे फोटोही समोर आल्याने ललित पैशांच्या जोरावर कैदी असतानाही अय्याशी करत जगत असल्याचे दिसून येते.
मोक्काअंतर्गत कारवाई?
ललित आणि त्याच्या टोळीविरोधात पुणे पोलिसांकडे अनेक पुरावे असून, पोलिसांनी या टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.
‘आपलं नाव तर घेणार?’
ललितला मदत करणाऱ्यांची मात्र धकधक वाढली आहे. ललित आपले नाव तर घेणार नाही ना, हा प्रश्न त्यांची चिंता वाढवत आहे.
गर्लफ्रेंड कोण?
ललितची गर्लफ्रेंड प्रज्ञा कांबळे असल्याचे स्पष्ट झाले आहे. ललित अथवा त्याच्या टोळीतील सदस्य गुन्ह्यात पकडला गेलाच तर त्यांना जामिनावर बाहेर काढण्याची जबाबदारी प्रज्ञा कांबळेवर असायची.
दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक
ललित याच्या दोन मैत्रिणींना बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पुणे पोलिसांनी नाशिक येथून अटक केली. ससून रुग्णालयातून ललित पळून गेल्यानंतर या दोघींनी त्याला २५ लाख रुपये दिले होते. न्यायालयाने दोघींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अर्चना किरण निकम (वय ३३), प्रज्ञा अरुण कांबळे उर्फ प्रज्ञा रोहित माहिरे (३९, रा. नाशिक) अशी अटक केलेल्या दोघींची नावे आहेत. ललितने पळून जाण्यापूर्वी दोघींची ससूनमध्ये भेट घेतली. पलायन केल्यानंतर ४ व ५ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे पुन्हा या दोघींची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघींनी त्याला २५ लाख रुपये दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
ललितला पळून जाण्यासाठी कट रचण्यात आला असून, त्याअनुषंगाने भेटीची ठिकाणे व गुन्ह्यांचे पुरावे दोघींकडून जप्त करायचे आहेत. त्यासाठी पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील नीलम यादव-इथापे यांनी केली.
ललितची सफारी गॅरेजबाहेर धूळखात
नाशिक : ललितची एक काळ्या रंगाची टाटा सफारी गाडी आठ ते दहा वर्षांपासून एका गॅरेजबाहेर धूळखात पडल्याचे शहर पोलिसांना आढळले आहे. गॅरेज चालकाकडे गाडी दुरुस्तीसाठी दिल्यानंतर पाटीलने कुठलाही पुढे पाठपुरावा केला नाही.