चुकीच्या माणसांना संस्थांवर बसविल्याने शिक्षण व्यवस्था उध्वस्त; लेखक डॉ. राजन हर्षे यांची टीका
By श्रीकिशन काळे | Published: December 22, 2023 04:09 PM2023-12-22T16:09:27+5:302023-12-22T16:11:39+5:30
अनेक ठिकाणी प्राध्यापकच वेडे असतात, त्यांना सांभाळण्याचे काम कुलगुरूला करावे लागते
पुणे: सध्या शिक्षणसंस्थांवर, विद्यापीठांवर नेमण्यात येणाऱ्या पदांबाबत गुणवत्तेची कदर केली जात नाही. कोणालाही पदावर बसवले जाते. परंतु, मुंगीला एव्हरेस्टवर बसवले तर तिचा हत्ती होत नसतो. अशा चुकीच्या माणसांना संस्थांवर बसविल्याने शिक्षण व्यवस्था उध्वस्त होत आहेत, अशी टीका अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू, लेखक डॉ. राजन हर्षे यांनी व्यक्त केली.
साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि डॉ. राजन हर्षे लिखित ‘पक्षी उन्हाचा-सात विद्यापीठांच्या आवारात’ पुस्तकावर शुक्रवारी सकाळी महाराष्ट्र साहित्य परिषदेत चर्चा करण्यात आली. या वेळी लेखक हर्षे, माजी कुलगुरू प्रा. पंडित विद्यासागर, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, संकल्प गुर्जर उपस्थित होते. संकल्प यांनी हर्षे आणि प्रा. विद्यासागर यांच्याशी पुस्तकाबाबत संवाद साधला.
प्रा. विद्यासागर म्हणाले, पुण्यात माणूस शिक्षण संस्थेबाहेरच खूप शिकतो. आज आपण गुरूला ‘गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा:’ असे बोलतो. पण गुरू शेवटी माणूसच आहे. त्याने भावनेच्या भरात मुलांना शिक्षण देऊ नये. खरंतर इतिहासात अनेक गुरूंनी चुकीची कामे केली. द्रोणाचार्यांनी काय केले, ज्ञानेश्वरांच्या गुरूंनी देखील त्यांना वाईट बोलले. यावर मात्र आपण कधी चर्चा करत नाही. वास्तवतेचे भान ठेवायला हवे. विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम करताना काय अडचणी येतात, यावर प्रा. विद्यासागर म्हणाले, माणूस महत्त्वाचा नाही, तर त्याला काय हवं ते पहायला हवं. विद्यापीठात अनेक विद्यार्थी संघटना असतात, त्यामागे खूप कंगोरे असतात. त्यामागील उद्देश पहायला हवा.’’
हर्षे म्हणाले, अनेक ठिकाणी प्रोफेसर चांगले नसतात, त्यांची गुणवत्ता किरकोळ असते. काही प्राध्यापक फार वेडे असतात. केवळ २ टक्के ब्राईट असतात. वेड्या लोकांना सांभाळण्याचे काम कुलगुरूला करावे लागते. आज तर कुलगुरूंची गुणवत्ताच ढासळली आहे. अर्ज मागवून कुलगरू ठरवले जातात. गुणवत्ता नसताना त्या पदावर बसवले जाते. खरंतर मुंगीला एव्हरेस्टवर ठेवले तर ती हत्ती होते का ? नाही ना ! पण अशा लोकांमुळे शिक्षण व्यवस्था मात्र बदनाम होत आहे. विद्यापीठात ध्येयवादी माणसं हवीत. नेत्यांच्या मागे करणारी माणसं नकोत.’’
विद्यासागर म्हणाले, पुर्वी विद्यापीठत स्वातंत्र्य होते, ते आता कमी होतेय. प्रशासनातील लोकं शिक्षणावर बोलायला लागलेत. ज्याला काही येत नसले तरी तो बोलतो. विद्यापीठांची स्वायत्तता राहिली नाही. सरकारी हस्तक्षेप वाढला आहे, तो कमी व्हायला हवा. विद्यापीठे काहीच करत नाहीत म्हणून देखील सरकारी हस्तक्षेप होतो. हा देखील भाग पहायला हवा. आहे. शिक्षकांच्या जागा भरल्या जात नाहीत. ४० चा स्टाफ १४ वर आलाय. कसं चालणार असं? ही परिस्थिती भयावह आहे. संशोधन केले नाही तर शिक्षणाची गुणवत्ता कमी होईल.