विद्यापीठात परीक्षा विभागाचा सावळा गाेंधळ सुरूच; आधी जुना पेपर, नंतर दीड तासाने नवी प्रश्नपत्रिका
By प्रशांत बिडवे | Published: January 5, 2024 06:23 PM2024-01-05T18:23:10+5:302024-01-05T18:23:36+5:30
परीक्षा विभागाने संगणक अभियांत्रिकी आणि इलेक्ट्राॅनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी तृतीय सत्राच्या परीक्षेत चक्क जुन्या प्रश्नपत्रिका पाठविल्या
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील सावळ्या गाेंधळामुळे अभियांत्रिकी शाखेतील तृतीय वर्षातील परीक्षार्थी विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामाेरे जावे लागले. शुक्रवारी (दि. ५) परीक्षा विभागाने संगणक अभियांत्रिकी आणि इलेक्ट्राॅनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी तृतीय सत्राच्या परीक्षेत चक्क जुन्या प्रश्नपत्रिका पाठविल्या. हा प्रकार उघडकीस येताच परीक्षा थांबवावी लागली. नवीन प्रश्नपत्रिका ई-मेल कराव्या लागल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना दाेनदा पेपर साेडवावा लागला.
पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातून परीक्षा सुरू हाेण्यापूर्वी एमबीए प्रथम सत्रातील विषयाची प्रश्नपत्रिका समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने काही दिवसांपूर्वीच ऐनवेळी पेपर रद्द करीत पुन्हा परीक्षेचे आयाेजन करण्याची नामुष्की ओढवली. हा प्रकार ताजा असतानाच शुक्रवारी सकाळी १० ते १२:३० दरम्यान संगणक अभियांत्रिकीच्या तृतीय सत्राचा डिजिटल इलेक्ट्राॅनिक्स अॅन्ड लाॅजिक डिझाइन २१०२४५ आणि इलेक्ट्राॅनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी तृतीय सत्राच्या डाटा स्ट्रक्चर २०४१८४ या विषयांच्या परीक्षेत जुने पेपर ई मेल करण्यात आल्याने संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रात मोठा गाेंधळ उडाला. यामुळे विद्यार्थ्यांना बराच वेळ वाट पाहत बसावे लागले.
एकच विषय दाेनदा साेडविला
परीक्षा सुरू हाेण्याच्या काही मिनिटांपूर्वी महाविद्यालयांना ई-मेलद्वारे प्रश्नपत्रिका पाठविल्या जातात. काही महाविद्यालयांत पेपर वितरित केल्यानंतर विद्यार्थ्यांनी भराभर पेपर लिहायला सुरुवात केली. मात्र तासाभरानंतर काॅलेजकडून परीक्षा थांबविण्यात आली. विभागाकडून तब्बल दीड तासाने नवीन प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली. त्यामुळे आम्हाला नव्याने पुन्हा उत्तरे लिहावी लागल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले.
परीक्षा सुरू हाेण्यापूर्वी ९ वाजून ५० मिनिटाला काही महाविद्यालय आणि परीक्षा केंद्रांनी दूरध्वनीवरून परीक्षा विभागाशी संपर्क साधत हरकती घेतल्याने तांत्रिक कारणास्तव प्रश्नपत्रिका रद्द केली. थाेड्याच वेळाने दुसरी प्रश्नपत्रिका सर्व केंद्रावर पाठविण्यात आली. सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य व परीक्षा अधिकाऱ्यांना यंत्रणेमार्फत कळविण्यात आले हाेते. दाेन्ही विषयांची परीक्षा सुरळीत पार पडली आहे असे स्पष्टीकरण परीक्षा विभागाकडून देण्यात आले.