Pune: एकाच कुटुंबातील तिघांचा विषप्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न, वडिलांचा मृत्यु, आई अत्यवस्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 23:09 IST2023-05-22T21:23:55+5:302023-05-22T23:09:10+5:30
Pune: सोमवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला असून तिघांनीही विषारी औषध घेतले

Pune: एकाच कुटुंबातील तिघांचा विषप्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न, वडिलांचा मृत्यु, आई अत्यवस्थ
पुणे/ फुरसुंगी : नैराश्य, आजारपण याला कंटाळून एका कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये ७० वर्षाच्या वडिलांचा मृत्यु झाला असून आई अत्यवस्थ आहे. ही घटना फुरसुंगीमधील लक्ष्मी निवास येथे सोमवारी सायंकाळी उघडकीस आली.
सूर्यप्रकाश हरिश्चंद्र अबनावे (वय ७०, रा. लक्ष्मी निवास, फुरसुंगी, हडपसर) यांचा मृत्यू झाला असून, त्यांची पत्नी जनाबाई सूर्यप्रकाश अबनावे (वय ६०) आणि मुलगा चेतन सूर्यप्रकाश अबनावे (वय ४१) विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोघांची नाव आहे. दोघांवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
फुरसुंगी येथील लक्ष्मी निवास येथे अबनावे रहातात. ते फोन उचलत नसल्याने त्यांचे नातेवाईक घरी आले. तेव्हा घर बंद होते. शेजारच्यानी दार वाजवले, पण आतून प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तर तिघेही घरात पडलेले आढळून आले. सूर्यप्रकाश अबनावे व जनाबाई हे अत्यवस्थ होते. चेतन हा बोलण्याच्या स्थितीत होता. त्याने विष प्राशन केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा सूर्यप्रकाश यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जनाबाई आणि चेतन यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी सांगितले की, अबनावे कुटुंब गेल्या १० ते १२ वर्षांपासून येथे रहात आहेत. सूर्यप्रकाश हे एका फोटोग्राफरकडे कामाला होते. ते निवृत्त झाले असून त्यांना उत्पन्नाचे काही साधन नाही. त्यांच्या पत्नीला कन्सर झाला असून तो अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. मुलगा चेतन याची नोकरी गेली असून त्याचे दोन घटस्फोट झाले आहेत. हे संपूर्ण कुटुंब आर्थिक व आजारपणामुळे नैराश्यच्या गर्तेत अडकले असल्याने त्यांनी असा टोकाचा निर्णय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज असल्याचे गोकुळे यांनी सांगितले.