कर्जबाजारी तरुणाचं टोकाचं पाऊल; महिलेला लुटण्याचा प्रकार आला अंगलट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 02:42 PM2023-01-17T14:42:20+5:302023-01-17T14:42:29+5:30
महिलेने विरोध करताच आजूबाजूच्या लोकांनी या चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले
धनकवडी : पादचारी महिलेच्या कानातील सोन्याची वेल ओढून चोरण्याचा प्रयत्न कर्जबाजारी झालेल्या युवकाच्या अंगलट आला. महिलेने विरोध करताच आजूबाजूच्या लोकांनी या चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. गणेश हनुमंत कदम (वय २३ वर्षे, राहणार हरपळे वस्ती, फुरसुंगी, हडपसर) असे या चोरट्याचे नाव आहे.
ही घटना कात्रजमधील संतोषनगर येथील गल्ली नं. ७ मध्ये सोमवारी (दि.१६) सायंकाळी सव्वा पाच वाजता घडली. याबाबत जाधवनगर मधील एका ३८ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत भारती विद्यापीठ पोलिसां नी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या सासूसोबत संतोषनगर मधील गल्ली क्रमांक ७ मधून पायी जात होत्या. त्याच वेळी त्यांच्या पाठी मागून एक जण आला व त्याने अचानक त्यांच्या कानातील सोन्याचे वेल जबरदस्तीने ओढून चोरण्याचा प्रयत्न केला. वेल निघत नाही म्हटल्यावर त्याने तो कापण्याचा प्रयत्न केला. दरम्यान फिर्यादी यांनी त्याला विरोध करीत आरडाओरडा केल्यामुळे आजू बाजूच्या लोकांचे लक्ष काय गोंधळ उडाला आहे. म्हणून त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी लगेच या चोरट्या ला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चोरट्याला अटक केली असून तो फॉर्मास्टि आहे. तो कर्जबाजारी झाल्याने त्याने चोरीचा प्रयत्न केल्याचे चौकशीत उघड झाले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता करीत आहेत.