त्यांच्या पक्षात गेलो नाही म्हणून कारखाना बंद पाडला; आघाडीच्या अशोक पवारांची सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 05:54 PM2024-11-07T17:54:55+5:302024-11-07T17:55:31+5:30
मी पवार साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, मला त्यांच्याकडे घेण्यासाठी किती त्रास दिला तरी पण मी गेलो नाही
उरुळी कांचन : इतर कारखान्यांना ५०० कोटी रुपये दिले. रावसाहेब पवार घोडगंगा साखर कारखान्याला मात्र नियमाने मिळणारे १६० रुपये सुद्धा दिले गेले नाहीत. कारखान्यावर पीएमआरडीएने सर्व्हे झोन दाखवला. यात त्यांना काहीच कळाले नाही म्हणून ड्रोन सोडले. आणि कारखाना शेतीझोनवर नेला. मी त्यांच्या पक्षात गेलो नाही म्हणून कारखाना बंद पाडला. बऱ्याच भागातील कारखाने मोडीत काढले. इथे संघर्षाला किंमत आहे, त्यामुळे मी पुन्हा कारखाना सुरू करून दाखवणार असल्याची ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांनी दिली. ते कोरेगावमूळ, टिळेकरवाडी व उरुळी कांचन परिसरात प्रचार गावभेट दौऱ्यात बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अशोक पवार यांचा पूर्व हवेलीत गावभेट दौऱ्याचे आयोजन बुधवारी (दि. ६) करण्यात आले होते. त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी त्यांनी थेऊर, नायगाव, पेठ, प्रयागधाम, कोरेगावमूळ, भवरापूर, टिळेकरवाडी, खामगाव टेक, शिंदवणे, वळती, तरडे, सोरतापवाडी, आळंदी म्हातोबाची या गावांत प्रचार सभा घेण्यात आल्या.
मी पवार साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता
पुढे बोलताना अशोक पवार म्हणाले, मी पवार साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मला त्यांच्याकडे घेण्यासाठी किती त्रास दिला तरी पण मी गेलो नाही, सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत. विकास होत राहील. परंतु शरद पवार साहेब यांच्यासोबत राहून महाराष्ट्राने निष्ठा शिकविली. मी हवेलीकरांना मान देतो, कारण त्यांचे शरद पवार यांच्यावर अतोनात प्रेम आहे. उत्तुंग असं नेतृत्व आम्हाला लाभले आहे. पूर्वी केलेल्या कामाचे दाखले तुमच्यासमोर आहेत. महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे.