Pune Porsche Car Accident: अख्ख्या अग्रवाल कुटुंबाचे भवितव्य टांगणीला; कुणाची रवानगी कुठं? बुधवारचा दिवस निर्णायक
By नम्रता फडणीस | Published: June 3, 2024 07:28 PM2024-06-03T19:28:55+5:302024-06-03T19:30:17+5:30
बाप विशाल अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अगरवाल आणि मुलाची आई शिवानी अग्रवाल यांच्यासह पब मालक, चालक, कर्मचारी आणि डॉक्टर यांची रवानगी कुठं होणार हे बुधवारी कळणार
Pune Porsche Car Accident : कल्याणीनगर अपघात प्रकरणात विविध गुन्हयात अटक झालेल्या आरोपींचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या सर्व आरोपींसाठी बुधवार ( दि. 5) चा दिवस निर्णायक ठरणार आहे. भरधाव वेगाने गाडी चालवित दोन तरुणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारा अल्पवयीन मुलगा, मुलाला महागडी पोर्शे गाडी देण्यासह दोन गुन्हयात आरोपी झालेला बाप विशाल अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अगरवाल आणि मुलाची आई शिवानी अग्रवाल यांच्यासह पब मालक, चालक, कर्मचारी आणि डॉक्टर यांची रवानगी कुठं होणार आहे हे बुधवारी कळणार आहे.
मुलाचा बाप विशाल अग्रवाल याने मुलाला दारुचे व्यसन असल्याचे न्यायालयात मान्य केले होते. त्यानुसार बाल न्याय मंडळाने अल्पवयीन मुलाचे दारुचे व्यसन सोडविण्यासाठी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठविण्याचा आदेश दिला आहे. मुलाला मुक्तांगणच्या व्यसनमुक्ती केंद्रात ठेवले जावे असे त्याच्या सुरुवातीच्या जामीन अर्जावेळीच न्यायालयाने आदेशात नमूद केले होते. या मुलाची बुधवार (दि. 5) पर्यंत सुधारगृहात रवानगी केली आहे. त्याला सुधारगृहात ठेवण्याची मुदत संपत आल्याने त्याचा तेथील मुक्काम वाढविणार की व्यसनमुक्तीसाठी मुक्तांगण केंद्रात ठेवणार की त्याची सुटका होणार यावर बुधवारी निर्णय घेतला जाणार आहे.
मुलाला वाचविण्यासाठी आई वडिलांनी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यात आई-वडील दोघेही अडकले. दोघांनाही विशेष न्यायालयाने दिलेल्या पोलिस कोठडीची मुदतही बुधवारी संपत आहे. त्यामुळे त्यांना दोघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. तेथून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात होणार की पोलिसांना दोघांची पोलिस कोठडी वाढवून मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलाला मोटार चालविण्यास देण्याबरोबरच अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरविल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक, कोझी व ब्लॅक पबच्या मालकांसह कर्मचाऱ्यांनी केलेल्या अर्जावरही बुधवारी सुनावणी होणार आहे. याशिवाय अल्पवयीन मोटार चालकाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यासह शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलिस कोठडीत दि. 5 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या कोठडीत अधिक वाढ होईल की थेट येरवडा कारागृहात् त्यांची रवानगी होईल हे बुधवारीच कळणार आहे.