Video: बाप लेकीचा पाठीराखा अन् लेक बापाचा आधार; सुप्रिया सुळेंसाठी वाट पाहत थांबले शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 06:00 PM2024-10-08T18:00:08+5:302024-10-08T18:00:53+5:30
पत्रकार परिषदेनंतर शरद पवार चक्क वाट पाहत थांबले असल्याने यातून बाप लेकीचे प्रेमळ नातं समोर आलं आहे
पुणे : बाप लेकीचा पाठीराखा अन् लेक बापाचा आधार असं प्रेमळ उदाहरण ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नात्यातून दिसून आलं आहे. पुण्यात सुप्रिया सुळेंची शरद पवार चक्क वाट पाहत थांबले आहेत. यातून बाप लेकीचे प्रेमळ नातं समोर आलं आहे. शरद पवार हे सुप्रिया सुळेंची वाट पाहतानाच व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर प्रसारित होतोय.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार त्यांच्या पक्षाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. पवार व सुळे सोमवारी दुपारपर्यंत इंदापूरमध्ये होते. तिथून ते दुपारी आले व दोघांनाही लगेच खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासमवेत मुलाखती सुरू केल्या. मार्केट यार्डमधील पक्ष कार्यालयात या मुलाखती सुरू आहेत. दुपारनंतर सायंकाळी उशिरापर्यंत या मुलाखती सुरू होत्या. रात्री साडेसात वाजता खासदार सुळे खाली आल्या, त्यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांना बोलण्याची विनंती केली. ती मान्य करत सुळे यांनी कार्यालयाच्या तळमजल्यावरील हॉलमध्ये लगेचच संवाद सुरू केला. दिवसभरातील घडामोडींची माहिती त्या देत होत्या.
दरम्यान शरद पवारही त्यांचे काम संपल्यावर कार्यालयातून खाली उतरले. त्यावेळी त्यांची गाडी हॉलच्या प्रवेशद्वाराजवळच होती. खासदार सुळे पत्रकारांबरोबर बोलत असल्याचे त्यांना दिसत होते. मात्र अतिशय शांतपणे त्यांनी गाडीजवळ उभे राहणे पसंत केले. एकदाही त्यांनी खासदार सुळे यांना कोणाबरोबर निरोप वगैरे काहीच पाठवला नाही. सुळे यांचे बोलणे संपल्यावर त्या आल्या. त्यावेळी पवार गाडीजवळ उभे असल्याचे पाहून त्याही चकित झाल्या. झाले ना, चला आता एवढेच पवार यांना म्हणाले व त्यानंतर दोघेही गाडीत बसून निघून गेले. मोदीबाग येथील निवासस्थानी ते गेले असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले
लोकसभेच्या विजयानंतर सुप्रिया सुळेंनी शरद पवार सोबत होते. म्हणून मी निवडणूक जिंकल्याचे सांगितले आहे. बाप पाठीशी असताना मुलीला कसलीही भीती चिंता नसते. शरद पवारांनी सुद्धा मी निवडून येण्यासाठी खूप प्रयत्न केले असल्याचे सुळे यांनी सांगितले होते. अजूनही अनेक ठिकाणी सभा, बैठका अथवा कुठल्याही कार्यक्रमाला गेल्यावर सुप्रिया सुळे पवारांची काळजी घेताना दिसून येतात. त्यांच्या बाप लेकीच्या नात्याचे अनेक किस्सेही पाहायला मिळतात. असाच हा बाप मुलीची वाट पाहतानाच व्हिडिओ चर्चेत आला आहे.