पीएच.डी अधिछात्रवृत्तीसाठीचा लढा पेटला; सारथी कार्यालयाबाहेर ठिय्या तर विधानभवनासमाेर उपाेषण
By प्रशांत बिडवे | Published: January 2, 2024 04:20 PM2024-01-02T16:20:44+5:302024-01-02T17:05:51+5:30
बुधवारी दि. ३ राेजी फुलेवाडा ते विधानभवन असा पायी लाॅंग मार्च काढण्यात येणार
पुणे : बार्टी संस्थेने पीएच.डी अधिछात्रवृत्ती देण्यासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा रद्द केली आहे. मात्र, अद्याप सारथी आणि महाज्याेती संस्थेच्या वतीने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे या संस्थांकडे अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज केलेले संशाेधक विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. सारथी कार्यालयासमाेर साेमवारी दि. १ राेजी राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदाेलन सुरू केले आहे तर दुसरीकडे महाज्याेती संस्थेकडे अर्ज केलेले विद्यार्थी आज दि. २ राेजी पुण्यात दाखल झाले असून विधानभवनासमाेर आमरण उपाेषणास बसले आहेत. सारथी संस्थेच्या कार्यालयाबाहेर आंदोलकांनी कडाक्याच्या थंडीत रात्र जागून काढली
बार्टी, महाज्याेती, आणि सारथी संस्थांमार्फत पीएच.डी करणाऱ्या संशाेधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यात येते. मात्र, २०२२-२३ नंतर प्रत्येक संस्थेमार्फत केवळ २०० संशाेधकांची निवड करून त्यांना अधिछात्रवृत्ती देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. तसेच या विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी येत्या १० जानेवारी राेजी चाळणी परीक्षा सीईटी चे आयाेजन केले आहे. मात्र, या निर्णयाविराेधात संशाेधक विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. सारथी संस्थेकडे अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी दि. १ पासून सारथी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदाेलन सुरू केले. साेमवारी रात्री कडाक्याच्या थंडीत आंदाेलकांनी रात्र जागून काढली. तर मंगळवारी दि. २ राेजी महाज्याेती संस्थेकडे अर्ज केलेले पुण्यासह, मुंबई, काेल्हापूर, जळगाव, गडचिराेली, अकाेला, अमरावती येथून संशाेधक विद्यार्थी पुण्यात दाखल झाले तसेच त्यांनी विधानभवनासमाेर आमरण उपाेषण सुरू केले आहे. तसेच बुधवारी दि. ३ राेजी फुलेवाडा ते विधानभवन असा पायी लाॅंग मार्च काढण्यात येणार असल्याचे महाज्याेतीच्या आंदाेलक विद्यार्थ्यांनी सांगितले.
महाज्याेती, सारथी तसेच बार्टी या संस्थांकडे अर्ज केलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना पीएच.डी साठी नाेंदणी केलेल्या दिनांकापासून सरसकट अधिछात्रवृत्ती देण्यात यावी तसेच येत्या १० जानेवारी राेजी आयाेजित केलेली सीईटी चाळणी परीक्षा रद्द करावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.