अंतिम मतदार यादी दुसऱ्यांदा लांबणीवर, सोमवारऐवजी मंगळवारी होणार प्रसिद्ध

By नितीन चौधरी | Published: January 20, 2024 05:02 PM2024-01-20T17:02:24+5:302024-01-20T17:05:10+5:30

दरवर्षी ५ जानेवारीला प्रसिद्ध होणारी ही यादी यंदा दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे...

The final voter list will be released on Tuesday instead of Monday after a second delay | अंतिम मतदार यादी दुसऱ्यांदा लांबणीवर, सोमवारऐवजी मंगळवारी होणार प्रसिद्ध

अंतिम मतदार यादी दुसऱ्यांदा लांबणीवर, सोमवारऐवजी मंगळवारी होणार प्रसिद्ध

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रसिद्ध करण्यात येणारी अंतिम मतदार यादी आता एक दिवसाने लांबणीवर पडली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही यादी आता सोमवार (दि. २२) ऐवजी मंगळवारी (दि. २३) जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. दरवर्षी ५ जानेवारीला प्रसिद्ध होणारी ही यादी यंदा दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्यात दरवर्षी ५ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाते. त्यापूर्वी प्रारुप मतदार यादी जाहीर करून त्यावर सुचना व हरकती मागविल्या जातात. यंदा २७ ऑक्टोबरला प्रारुप मतदार यादी जाहीर केल्यानंतर ५ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, दुबार नावे वगळणे तसेच मयतांची नावे वगळणे या कामासाठी १५ दिवसांचा अतिरिक्त अवधी मिळावा तसेच नवमतदारांना देखील नाव नोंदणीची पुन्हा संधी मिळावी यासाठी २२ जानेवारीला अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचे ठरले होते. नावे वगळल्याने मतदारयादीचे शुद्धीकरण होण्यास मदत होईल असे या वेळी सांगण्यात आले. मात्र, आता ही तारीख आणखी एका दिवसाने पुढे ढकलण्यात आली आहे. ही यादी सोमवारऐवजी मंगळवारी प्रसिद्ध करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत.

याबाबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले, “राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सरकारने जाहीर केलेली सार्वजनिक सुटी लक्षात घेता अंतिम मतदार यादी २२ जानेवारीच्या ऐवजी २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाईल.” दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तीन दिवसीय आढावा बैठक घेतली. त्यात या शिष्टमंडळाने पोलिस आणि इतर अंमलबजावणी संस्थांना अनधिकृत रोकड, दारू, ड्रग्ज आणि इतर प्रलोभनांच्या हालचालींवर लक्ष ठेवून राज्य निवडणूक यंत्रणेने कडक दक्षता आणि देखरेखीसह प्रलोभनमुक्त निवडणुकांवर भर द्यावा असेही निर्देश दिले आहेत.

याबाबत देशपांडे म्हणाले, “केंद्रीय निवडणूक आयोगाने महिला, तरुण तसेच उपेक्षित गट, ज्यामध्ये अपंग व्यक्ती आणि ट्रान्सजेंडर मतदार आणि नवमतदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले आहेत.” या बैठकीत सर्व जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षकांनी शिष्टमंडळासमोर तयारीबाबत तपशीलवार सादरीकरण केले.

Web Title: The final voter list will be released on Tuesday instead of Monday after a second delay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.