मुख्यमंत्र्यांचाच अंतिम निर्णय असल्याने अर्थ खात्याची काळजी नाही : दिपक केसरकर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 10:20 AM2023-07-15T10:20:39+5:302023-07-15T10:22:58+5:30
दीपक केसरकर यांनी नवीन खाते वाटपावर भाष्य केले...
पुणे : सरकारमध्ये कायमच राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खाते दिले तरी त्यांच्या निर्णयांवर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा असेल, असे अजितदादांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळे अर्थ खात्याची शिवसेनेला काळजी नाही, अशा शब्दांत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नवीन खाते वाटपावर भाष्य केले.
पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या कार्यक्रमावेळी केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असताना मी चांदा ते बांदा ही योजना आणली. त्या योजनेचे ४०० कोटी रुपये काढून घेण्यात आले. या योजनेला अर्थखात्याकडून निधी मिळाला नाही. दादा म्हणाले की जर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले असते तर मी ही योजना बंद केली नसती; पण ठाकरे यांनी दादांना एका शब्दानेही सांगितले नाही. तेव्हा ही परिस्थिती होती. मागील सरकारमध्ये काय नाराजी होती? ही अजितदादांनी समजून घेतली आहे. अर्थमंत्री म्हणून अजितदादा सर्वांना न्याय देतील, याची खात्री आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वांना वेळ देत असून, चांगले काम करत आहेत. सर्वांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी चांगले काम केले आहे. त्यामुळे तीन पक्षांचे सरकार उत्तम कारभार करेल.
सत्तार आणि राठोड यांना विचारूनच खाते बदल
मंत्री अब्दुल सत्तार यांचे कृषी खाते काढून राष्ट्रवादीला दिल्याबद्दल विचारले असता केसरकर म्हणाले, कृषिमंत्री म्हणून अब्दुल सत्तार यांनी चांगले काम केले. शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी सत्तारांशी बोलूनच कृषी खाते राष्ट्रवादीला दिले. सत्तार यांनी होकार कळवल्यानेच हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच येत नाही. संजय राठोड यांच्याशी देखील चर्चा करून खाते बदलण्यात आले. सत्तार त्यांच्या मतदारसंघात चांगल्या मतांनी निवडून आले आहेत. यापुढेही ते विजयी होतील, असे केसरकर यांनी सांगितले.