VIDEO: "रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी, देह दंगे सावळ्याच्या अंगणी" बेलवाडीत पहिले अश्व रिंगण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 09:33 AM2023-06-20T09:33:41+5:302023-06-20T09:34:21+5:30

अश्व रिंगण सोहळ्याची सुरूवात अक्षय मचाले यांच्या मानाच्या मेंढ्यांच्या रिंगणाने झाली...

The first horse arena of Sant Tukaram Maharaj's palanquin ceremony was carried out with enthusiasm | VIDEO: "रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी, देह दंगे सावळ्याच्या अंगणी" बेलवाडीत पहिले अश्व रिंगण

VIDEO: "रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी, देह दंगे सावळ्याच्या अंगणी" बेलवाडीत पहिले अश्व रिंगण

googlenewsNext

रविकिरण सासवडे / पोपटराव मुळीक 
बारामती / लासुर्णे : "रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी, देह दंगे सावळ्याच्या अंगणी" देहभान विसरवणारा, सावळ्याच्या विठूच्या चरणी लीण करणारा, शिण घालवणारा, चैतन्याचा झरा म्हणजे रिंगण सोहळा. टाळ मृदंगाचा होणारा गजर आणि विठूनामाचा जयघोष लहान-थोरांचां दांडगा उत्साहाने रिंगण सोहळ्याची भव्यता उत्तरोत्तर वाढवली. जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले अश्व रिंगण बेलवाडी (ता. इंदापूर) येथे  मंगळवारी (दि. २०) मोठ्या उत्साहात पार पडले.

'नाम तुकोबाचे घेता
डोले पताका डौलात
अश्व धावता रिंगणी
नाचे विठू काळजात'

अशी भावना अश्व रिंगणाचा अनुपम्य सोहळा अनुभवताना, ‘रामकृष्ण हरीचा जयघोष’ करताना वारकरी गहिवरले होते. रिंगण सोहळ्याला पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांसह इंदापूर, बारामती, माळशिरस, नातेपुते आदी भागातील लाखो ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. या रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचं पारणं फेडले. सणसर येथील मुक्कमानंतर तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे पहिल्या अश्व रिंगणासाठी बेलवाडी येथे ‘ज्ञानोबामाऊली-तुकाराम’ अशा जयघोषात आगमन झाले. सकाळी सात वाजल्यापासूनच रिंगणस्थळावर भाविकांनी गर्दी केली होती.

अश्व रिंगण सोहळ्याची सुरूवात अक्षय मचाले यांच्या मानाच्या मेंढ्यांच्या रिंगणाने झाली. यानंतर टाळकरी, पोलिस होमगार्ड, विणेकरी, तुळसी वृंदावन धारक महिला, झेंडेकऱ्याचे रिंगण पार पडले. यावेळी  विठू नामाच्या गजरात रिंगणासाठी धावताना अबाल-वृध्दांचे भान हरपले.

वारकरी भाविकांनी रिंगण सोहळ्या दरम्यान अलिखित शिस्तबद्ध नियमांचे दर्शन घडवले. यानंतर मानाच्या अश्व रिंगणाला सुरूवात होताच उपस्थित लाखो भाविकांनी ज्ञानोबा-तुकाराम चा एकच जयघोष केला. या जयघोषाने अवघे आसमंत दुमदुमले. यावेळी अश्व पुढे जाताच त्याच्या चरणी असणारी रज भाळी लावण्यासाठी एकच झुंबड उडाली. यानंतर महिला-पुरूषांनी फुगड्यांचे फेर धरले. तर कोणी टाळ मृदुंगाच्या तालावर विठूनामाचा ठेका धरला.

विठ्ठलाच्या दारी कोणी लहान-थोर नाही. या भावनेने प्रत्येकजण एकमेकाच्या पाया पडत होते. रिंगण सोहळ्यानंतर येथील हनुमान मंदिरामध्ये पालखी सोहळा विश्रांतीसाठी विसावला. तत्पूर्वी  तहसीलदार श्रीकांत पाटील, सोहळा प्रमुख संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. भानुदास महाराज मोरे, ह.भ.प. संजय महाराज मोरे, ह.भ.प. अजित महाराज मोरे, ह.भ.प. अभिजित महाराज मोरे देहु संस्थान, बैलजोडी मानकरी महेंद्र झिंर्जुडे, दादासाहेब शेळके, शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार, आमदार दत्तात्रय भरणे, कांतीलाल जामदार, सर्जेराव जामदार  सरपंच मयुरी शरद जामदार, उपसरपंच नामदेव इतापे, शहाजी शिंदे, पंकज जामदार, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, उपनिरीक्षक अतुल खंदारे, अ‍ॅड. शुभम निंबाळकर आदींनी पालखी रथाचे स्वागत केले.  पालखी रिंगण सोहळ्यासाठी मोठ्या  प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: The first horse arena of Sant Tukaram Maharaj's palanquin ceremony was carried out with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.