पाण्याचा प्रवाह जास्त आहे, तू आत जाऊ नकोस; बारामतीत ओढ्यातून दुचाकीस्वार गेला वाहून
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 11:31 AM2022-10-20T11:31:08+5:302022-10-20T11:31:29+5:30
दुचाकीस्वार ओढ्यात गाडी घालण्याचा प्रयत्न करत असताना घडली ही घटना
मोरगाव : मोरगाव- मुर्टी या रस्त्यावरील जाधव वस्ती शेजारील होलनकुंडच्या ओढ्यातून रात्री दुचाकीवरील एक अज्ञात व्यक्ती ओढ्यात वाहून गेला असल्याची घटना घडली आहे. येथील एका स्थानिक व्यक्तीने संबंधित व्यक्ती वाहून जात असतानाचा पाहिले असल्याने या स्थानिक व्यक्तीच्या सांगण्यावरून शोध कार्य सुरू आहे.
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, मोरगाव- मुर्टी या रस्त्यावरील जाधववस्ती शेजारी होलनकुंडचा ओढा आहे. या ओढ्यातील पाण्याचा प्रवाह काल झालेल्या पावसाने पुन्हा वाढू लागला होता. याच दरम्यान एक दुचाकीस्वार ओढ्यात गाडी घालण्याचा प्रयत्न करत असताना येथील हॉटेल सानिकाच्या मॅनेजरने ''पाण्याचा प्रवाह जास्त आहे, तू आत मध्ये जाऊ नको'' असे सांगितले. मात्र संबंधित व्यक्तीने न ऐकता पुढे गेला असता या हॉटेल मॅनेजरने संबंधित व्यक्ती ओढ्यात वाहून गेला असल्याची माहिती स्थानिक पोलीस पाटील व पोलीस प्रशासनाला दिले .
घटनेची माहीती समजताच वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षण सोमनाथ लांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. स्थानिक व्यक्तीच्या सांगण्यावरून मुर्टी येथील तरुणांच्या मदतीने या दुचाकीचा व वाहून गेलेल्या अज्ञात व्यक्तीचा तपास सुरू केला असल्याची माहिती पोलीस पाटील तृप्ती गदादे यांनी दिली.