तुम्ही खाता त्या प्रसादात भेसळ आहे, पण कारवाई करणार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 12:42 PM2023-09-11T12:42:34+5:302023-09-11T12:47:27+5:30

धाडी टाकणारी समिती कुठेय?...

The food you eat is adulterated, but who will take action pune latest news | तुम्ही खाता त्या प्रसादात भेसळ आहे, पण कारवाई करणार कोण?

तुम्ही खाता त्या प्रसादात भेसळ आहे, पण कारवाई करणार कोण?

googlenewsNext

पुणे : सणवाराचे दिवस आले असून, त्यानिमित्त गोडधोड पदार्थांना मागणी वाढली आहे. पुरवठा वाढला की, पदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढायला लागते. त्यामुळे दुकानदारांचा धंदा वाढतो; पण नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात येत आहे. त्यामुळे भेसळयुक्त पदार्थांवर कारवाई करण्यासाठी एक महिन्यापूर्वी उच्चस्तरीय जिल्हा समित्या स्थापन केल्या. त्यांचे काम मात्र अद्याप कागदावरच आहे.

गणरायाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे मिठाईच्या दुकानात आता गर्दी होऊ लागली आहे. मिठाई, दुग्धजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. या मागणीचा पुरवठा कमी पडू नये, म्हणून भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ तयार केले जात आहेत. राज्यात अनेक ठिकाणी भेसळयुक्त दूध, पनीर, मिठाईचा साठा जप्त केला आहे. हा विषय अत्यंत गंभीर असून, त्याचा नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंध येतो; परंतु त्याकडे सरकारी पातळीवर दुर्लक्ष केले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. कारण जुलै महिन्यात राज्य सरकारने दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ होऊ नये म्हणून जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली. त्याची रचनाही जाहीर झाली; परंतु अद्याप या समितीचे काम मात्र काही दिसत नाही, तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने त्यांनाही नियमित कारवाई करता येत नाही. नागरिकांनी तक्रार केली तरच ते संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी करतात.

जिल्हास्तरीय समिती

- दूध तपासणी करण्यासाठी जिल्ह्याच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीत अपर पोलिस अधीक्षक, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, उपनियंत्रक वैधमापन शास्त्र हे सदस्य, तर जिल्हा दूध व्यवसाय विकास अधिकारी हे सदस्य सचिव आहेत.

कारवाईची तरतूद काय?

- अन्न व औषधी प्रशासनाच्या तपासणीत केमिकलयुक्त दूध निष्पन्न झाले, तर भादंवि ३२८ कलमान्वये गुन्हा दाखल होतो. हा गुन्हा अजामीनपात्र आहे. पाणी किंवा मिल्क पावडर मिक्स केल्याचे आढळल्यास २६२ नुसार आर्थिक दंड करण्याची तरतूद आहे.

भेसळयुक्त दुधाचे दुष्परिणाम

आयसीएमआरच्या अहवालानुसार भेसळयुक्त दुधाचे सेवन केल्यास क्षयरोग होऊ शकतो. युरियाची भेसळ केल्याने त्यातील नायट्रोजन या घटकामुळे मूत्रपिंड, हृदय व यकृत यासारखे अवयव निकामी होण्याची भीती असते, तसेच कॉस्टिक सोड्याच्या भेसळीमुळे दुधातील शरीरवाढीसाठी आवश्यक असणारे लायसिन हे अमिनो आम्ल शरीरास उपलब्ध होत नाही. परिणामी लहान मुलांच्या वाढीवर परिणाम होऊन शरीराची वाढ खुंटते. यामधील सोडिअमसारख्या घटकाचा मानवी शरीरावर परिणाम होऊन उच्च रक्तदाब व हृदयविकारासारखे आजार जडतात, असे डॉ. नितीन कदम यांनी सांगितले.

दुधातील भेसळ कशी ओळखायची?

सिंथेटिक दुधाची चव कडू लागते. बोटांदरम्यान चोळले की, ते साबणासारखे स्निग्धपणासारखे वाटते. गरम झाल्यावर ते पिवळे होते. जमिनीवर दुधाचा थेंब टाकला तर तो जमिनीत लगेच जिरला तर त्यात भेसळ असते. तो थेंब तसाच थांबला तर ते शुद्ध दूध समजावे.

आमच्याकडे तक्रार केल्यानंतर आम्ही लगेच संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई करतो. नागरिकांनी आमच्याकडे तक्रारी कराव्यात. भेसळयुक्त पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवून त्याची तपासणी होते. त्यानंतर भेसळ झाली असेल तर खटला भरला जातो.

- अर्जुन भुजबळ, सहायक आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन, पुणे

दुधात डिटर्जंट, सिंथेटिक घटक, युरिया, कॉस्टिक सोडा, फॉर्मेलिन यासारख्या घटकांची भेसळ केली जाते. यामुळे आरोग्यावर दीर्घकाळ घातक परिणाम होत आहेत. या घटकांमुळे अन्नातून विषबाधा, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल गुंतागुंत, विविध विकार, हृदयविकार, कर्करोग किंवा इतर गंभीर आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. दुधात युरिया मिसळला जातो, जेणेकरून दुधात चरबीचे प्रमाण पूर्वीपेक्षा जास्त दिसून येते. असे केल्याने दूध जाड आणि शुद्ध दिसते आणि बहुतेक लोक त्याला पसंती देतात, तसेच दुधात युरिया आणि पाणी तर सर्रास टाकले जाते.

- डॉ. नितीन विलास कदम, वैद्यकीय अधिकारी, पुणे

मागणी वाढली की पुरवठा करण्यासाठी दुधात भेसळ केली जाते, तसेच दुग्धजन्य पदार्थांमध्येही काहीही टाकून भेसळ करतात. आता अशा भेसळखोरांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा समित्या स्थापन केल्या आहेत; पण त्याची अजून एकही बैठक झालेली नाही. हा नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न असल्याने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.

- गोपळराव म्हस्के

Web Title: The food you eat is adulterated, but who will take action pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.