कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळ दहीहंडी संघाने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी
By अतुल चिंचली | Published: August 20, 2022 12:50 AM2022-08-20T00:50:45+5:302022-08-20T00:51:02+5:30
बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे कोविड संकटानंतर दोन वर्षांच्या कालावधीनंतर मोठया जल्लोषात यंदा दहीहंडी उत्सव कोतवाल चावडी येथे साजरा करण्यात आला.
पुणे : ढोल-ताशांचा पारंपरिक गजर आणि गोविंदा आला रे आला...च्या जयघोषात कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळ दहीहंडी संघाच्या गोविंदांनी बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी ६ थर लावून फोडली. शुक्रवारी रात्री ०९ वाजून १८ मिनीटांनी अवघ्या तिसर्या प्रयत्नात दहीहंडी फोडण्यात गोविंदांना यश आले. मच गया शोर... काठी न घोंगडे... सारख्या पारंपरिक गाण्यांप्रमाणेच नव्या गाण्यांवर तरुणाईने ताल धरत गोपाळकाला व दहीहंडी उत्सव साजरा केला.
बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे कोविड संकटानंतर दोन वर्षांच्या कालावधीनंतर मोठया जल्लोषात यंदा दहीहंडी उत्सव कोतवाल चावडी येथे साजरा करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सौरभ रायकर, सचिन आखाडे, मंगेश सूर्यवंशी, अमोल चव्हाण, तुषार रायकर यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळ दहीहंडी पथकातील गोविंदाने हंडी फोडताच गोपाळभक्तांनी एकच जल्लोष केला. दहीहंडी संघाला सन्मानचिन्ह, २५ हजार रुपये, गणेशाची प्रतिमा बक्षिस म्हणून देण्यात आली.
सुरुवातीला सायंकाळी नादब्रह्म ढोल ताशा पथक ट्रस्टमधील वादकांनी पारंपरिक वाद्यवादन करुन उपस्थितांना ठेका धरायला लावला. पुण्यासह इतर शहरांतून गोविंदा पथके दहिहंडी फोडण्याकरीता आली होती, असे मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी सांगितले.