Pune Crime: हडपसर भागात २० वाहने फोडून दहशत पसरविणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 10:11 AM2024-05-28T10:11:18+5:302024-05-28T10:12:06+5:30
हा प्रकार २४ मे रोजी रात्री दोनच्या सुमारास काळेपडळ येथील संकेत विहार तसेच ससाणेनगर येथे घडला होता...
पुणे : हडपसर भागातील काळेपडळ परिसरात किरकोळ वादातून टोळक्याने १५ ते २० वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी चैतन्य सूर्यवंशी, आदित्य मोहोळकर यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हा प्रकार २४ मे रोजी रात्री दोनच्या सुमारास काळेपडळ येथील संकेत विहार तसेच ससाणेनगर येथे घडला होता. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी शहरातील पाणीपुरवठा बंद होता. फिर्यादी अमोल आणि त्याचा मित्र उमेश ससाणे यांनी काळेपडळ परिसरात टँकर मागविला होता. ते टँकरद्वारे सय्यदनगर येथे पाणीवाटप करीत होते. त्यावेळी टँकरचा धक्का चैतन्य आणि आदित्य यांना लागला. यातून झालेल्या वादातून आरोपींनी रात्री दोनच्या सुमारास फिर्यादी राहत असलेल्या घराच्या परिसरात पार्क केलेल्या कार, टेम्पो, रिक्षा अशा एकूण १५ ते २० वाहनांची दगड व हत्याराने तोडफोड करून दहशत निर्माण केली होती. दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना तपास पथकाने आरोपींची नावे निष्पन्न करून त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन व हत्यारे जप्त केली आहेत.
ही कारवाई सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, पोलिस निरीक्षक गुन्हे मंगल मोढवे यांच्या सूचनेप्रमाणे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलिस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलिस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखिल पवार, प्रशांत टोणपे, भगवान हंबर्डे, अजित मदन, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, सचिन गोरखे, अमित साखरे, कुंडलिक केसकर, रामदास जाधव, अनिरुद्ध सोनवणे, अमोल जाधव यांच्या पथकाने केली.