'गॅस रेग्युलेटर बसत नाही...' कस्टमर केअरच्या सल्ल्यावरून गमावले सहा लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 08:50 PM2023-01-19T20:50:12+5:302023-01-19T20:50:59+5:30
सायबर चोरट्यांनी गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार
पुणे: गॅस संपल्यानंतर नवीन सिलेंडरला रेग्युलेटर अनेकदा बसत नाही. तेव्हा गॅस सिलेंडर वितरकाला फोन करतो, त्यांचा माणूस येऊन बसवून देतो. पण एका ज्येष्ठ नागरिक महिलेने एच पी कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर गुगलला सर्च केला. त्याने दिलेल्या सल्ल्यानुसार वागली आणि तब्बल ५ लाख ७३ हजार रुपयांना सायबर चोरट्यांनी गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी भांडारकर रोडवर राहणार्या एका ६४ वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ४ जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरातील गॅस सकाळी संपला. नवीन सिलेंडरला रेग्युलेटर बसत नव्हता. त्यामुळे त्यांनी गुगलवर एच पी कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर सर्च करुन त्यावर संपर्क केला. त्याला रेग्युलेटरबाबत सांगितल्याने त्याने मोबाईलवर क्वीक हेल्प अॅप डाऊनलोड करायला सांगितले. त्यामध्ये त्यांना सर्व माहिती भरायला सांगितली. त्याप्रमाणे त्यांनी बँकेसह सर्व माहिती भरली. त्यानंतर त्यांना त्या चोरट्याने २५ रुपये पाठविण्यास सांगितले. ते पैसे पाठविल्यावर तंत्रज्ञ येऊन तुम्हाला काम करुन देईन, काही पैसे असेल तर ते सांगेल, असे सायबर चोरट्याने सांगितले. तेव्हा त्यांना अशा प्रकारे फसवणूक होत असल्याची लक्षात आले. त्याने हिंदीतूनच त्यांना अशी फसवणूक होत असल्याची आम्हाला माहिती आहे. तुम्हाला एच पीची २५ रुपयांची पावती मिळेल, असे सांगितल्यावर त्यांनी त्यांनी एकीकडे फोनवर बोलत असतानाच २५ रुपये ट्रान्सफर केले. त्या पाठोपाठ त्यांच्या मोबाईलवर एका पाठोपाठ मेसेज येण्यास सुुरुवात झाली. त्यांनी ते पाहिल्यावर आपली फसवणुक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने बँकेला फोन करुन बँक खाते गोठविण्यास सांगितले. तोपर्यंत सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून ५ लाख ७३ हजार ८०७ रुपये काढून घेतले होते.
उशिरा सुचले
सायबर चोरट्याने फसविल्याचे लक्षात आल्याने या महिलेने पतीच्या मोबाईलवरुन बँकेत फोन करुन आपले खाते गोठविण्यास सांगितले. त्यानंतर आपल्या पतीला उठविले. त्यांनी लगेच गॅसचा रेग्युलेटर बसवून दिला. आपल्या सूनेसाठी पाऊंड मध्ये चलन रुपांतरीत करण्यासाठी त्यांनी हे पैसे बचत खात्यात ठेवले होते. चाेरट्यांनी त्यावरच डल्ला मारला.