मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवून करणार होता अत्याचार; दक्षतेने फसला डाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 15:02 IST2022-09-13T15:02:14+5:302022-09-13T15:02:30+5:30
आरोपीच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) आणि विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवून करणार होता अत्याचार; दक्षतेने फसला डाव
पुणे : बागेत खेळत असलेल्या शाळकरी मुलींनी दक्षता दाखवून आपल्याला मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखविणाऱ्याची माहिती दिल्याने त्याचा डाव फसला. या मुलींशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राहुल लहू कदम (५३, रा. पीएमसी काॅलनी, संभाजीनगर, वाकडेवाडी, मुंबई - पुणे रस्ता) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका मुलीच्या वडिलांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शाळकरी मुलगी आणि तिच्या मैत्रिणी बागेत खेळत होत्या. त्यावेळी कदम बागेत थांबला होता. कदमने मुलींचा पाठलाग करून त्यांना मोबाइलवर अश्लील चित्रफीत दाखविली. उद्यानात थांबलेले शेखर साठे यांनी हा प्रकार पाहिला. त्यानंतर कदम तेथून पसार झाला. साठे यांनी त्याचा पाठलाग केला. कदम पीएमसी वसाहतीत गेल्याचे त्यांनी पाहिले.
दरम्यान, मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी कदमचा शोध घेतला. त्याचा पत्ता शोधून काढला. कदम पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. कदम याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) आणि विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रेश्मा मावकर तपास करत आहेत.