आषाढी पायीवारी: जाईन गे माये तया पंढरपुरा! भेटेन माहेर आपुलिया!! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 09:32 PM2022-06-21T21:32:33+5:302022-06-21T21:33:15+5:30

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १९२ व्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यास पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली.

the glorious departure of mauli dnyaneshwar maharaj palkhi from alankapuri to pandharpur | आषाढी पायीवारी: जाईन गे माये तया पंढरपुरा! भेटेन माहेर आपुलिया!! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान

आषाढी पायीवारी: जाईन गे माये तया पंढरपुरा! भेटेन माहेर आपुलिया!! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान

googlenewsNext

भानुदास पऱ्हाड, लोकमत न्यूज नेटवर्क
 
आळंदी:
अवघाचा संसार सुखाचा करीन! आनंदे भरीन तिन्ही लोक!! जाईन गे माये तया पंढरपुरा! भेटेन माहेर आपुलिया!! संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १९२ व्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यास पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली. भक्तीच्या या वैभवी सोहळ्यात लाखो वैष्णवांनी माउलींच्या समाधीचे दर्शन घेत प्रत्यक्ष स्वता:च्या नयनांनी हा उभा सोहळा अनुभवला. सायंकाळी साडेआठच्या सुमारास माउलींच्या पालखीने प्रस्थान ठेवले. ‘ज्ञानोबा - माऊली - तुकारामांचा’ देहभान विसरून जयघोष करीत पंढरीकडे जाण्यासाठी लाखो वारकरी ज्ञानियांच्या अलंकापुरीत दाखल झाल्याने प्रस्थान सोहळ्यासाठी जणू भक्ती सागरच लोटला आहे.

प्रस्थान सोहळ्यास मंगळवारी (दि.२१) पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाल्यानंतर ‘श्रीं’ना पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधआरती करण्यात आली. त्यानंतर नित्यनियमाप्रमाणे भाविकांच्या पूजा व दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले होते. दुपारी बाराला ‘श्रीं’ना महानैवेद्य देऊन प्रस्थान सोहळ्याच्या तयारी सुरु झाली. प्रथम मानाच्या ४७ दिंड्याना मुख्य महाद्वारातून मंदिरात घेण्यात आले. त्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास माउलींच्या दोन्ही अश्वांनी मंदिरात प्रवेश केला. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व हैबतबाबा यांच्यातर्फे ‘श्रीं’ची आरती केल्यानंतर विना मंडपात मानकर्यांना मान देऊन सजवलेल्या पालखीत माउलींच्या पादुकांना विराजमान करण्यात आल्या. तद्नंतर ग्रामस्थ व मानकर्यांच्या खांद्यावरून संजीवन समाधी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखीने महाद्वारातून प्रस्थान ठेवले.

तत्पूर्वी, वारकऱ्यांनी टाळ - मृदुगाच्या निनादात ‘ज्ञानोबा - तुकारामांचा’ जयघोष करत फेर, फुगड्यानी मंदिर परिसर अगदी दुमदुमून सोडला होता. वारकर्यांच्या उत्साहाला आंनदाची भरती आली होती. भगवी पताका खांद्यावर घेतलेले पुरुष वारकरी, तुळशीवृदावन डोईवर घेऊन विठूनामाच्या गजरात तल्लीन झालेली महिला वारकरी आणि यामध्ये सहभागी झालेले तरुण वारकर्यांनी प्रस्थान सोहळ्यात लक्ष वेधून घेतले. सुमारे पाच तासांहून अधिक वेळ चाललेल्या वैभवी प्रस्थान सोहळ्यात वारकरी भजनात अक्षरशः हरवून गेला. सायंकाळी उशिरा हा वैभवी सोहळा भरावरस्तामार्गे, भैरवनाथ महाराज चौक, हजेरी मारुती, चावडी चौक, महाद्वारचौकातून दर्शन मंडप इमारतीत पहिल्या मुक्कामासाठी विसावला. 

-  माउलींच्या आषाढी पायीवारी प्रस्थान प्रसंगी पवमान अभिषेक, ११ ब्रम्हवृन्दांचा वेदघोष, समाधीवर माऊलींच्या मुखवट्याला दुध, मध व दह्याचा अभिषेक करण्यात आला. नंतर गरम पाण्याने ‘श्रीं’ना स्नान घालण्यात आले. सुवासिक चंदन, अत्तर लावून माऊलींची सर्वांगसुंदर पूजा बांधून मुखवट्यावर पोशाख परिधान करण्यात आला. या विधिवत पूजासमयी माऊलींचे ‘साजिरे’ रूप आकर्षक दिसून येत होते.

-  आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्य महाद्वारातून मानाच्या ४७ दिंड्याना मंदिरात प्रवेश दिल्यानंतर टाळ - मृदुंगाचा निनाद व ‘ज्ञानोबा तुकारामां’चा जयघोष अंगावर शहारे उमटवीत होता. फेर, फुगडी, मनोऱ्यामधून मनसोक्त बेभान होऊन वारकरी नाचत होते. याप्रसंगी मंदिरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

-  वारीत राजकारणाचा विसर... राज्यात राजकीय वातावरण तापले असताना शिवसेनेचे खासदार संजय जाधव व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते - पाटील यांनी आळंदीत प्रस्थान सोहळ्यात आध्यात्मिक फुगडी खेळून वारीचा आनंद लुटला. 

-  प्रस्थान सोहळ्याप्रसंगी आमदार रोहित पवार, विधानपरिषदेचे भाजपचे नवनिर्वाचित आमदार श्रीकांत भारतीय, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पालखी सोहळा प्रमुख ऍड. विकास ढगे पाटील, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अभय टिळक,  तहसीलदार वैशाली वाघमारे, मालक बाळासाहेब आरफळकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव, वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदिंसह वारकरी, मानकरी, सेवेकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

-  प्रस्थान सोहळ्याला विलंब.... यंदा वेळेत सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करूनही प्रस्थान सोहळ्याला विलंब झाला. मानाच्या दिंड्या मंदिरात घेण्यास विलंब झाला. त्यात आत येणाऱ्या दिंड्यामधील वारकऱ्यांची संख्या निश्चित नसल्याने मंदिर परिसरात क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाली होती. त्यामुळे व्यवस्थेत ताण आला. परिणामी सर्वच कार्यक्रमाला दिरंगाई झाली.

*     घंटानादाने पालखी प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ.
*     धार्मिक वातावरणात व चैतन्यमय भक्तिरसात अलंकापुरी चिंब.
*     प्रस्थान सोहळ्यासाठी जमला वैष्णवांचा अलोट भक्तिसागर.
*     पोलिसांचा कडेकोट चोख बंदोबस्त.
*     अलंकापुरी पताकांनी भगवीमय.
*     फेर, फुगड्या... अन अभंग इंद्रायणी काठावर रंगला भक्तांचा आनंदमेळा.

Web Title: the glorious departure of mauli dnyaneshwar maharaj palkhi from alankapuri to pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.