Devendra Fadnavis: महिलांचे अर्ज भरून घ्यायचे ते सरकारला द्यायचे नाहीत; फडणवीसांचा विरोधकांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 02:13 PM2024-07-21T14:13:23+5:302024-07-21T14:13:58+5:30
विरोधक किती लबाड आहेत बघा, या योजनेला सभागृहात विरोध करतात, गावागावात पहिले जाऊन पोस्टर आपलं लावतात
पुणे : पुण्याच्या बालवाडीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. महाविकास आघडीच्या काळात जलशिवारयुक्त योजना, पंतप्रधान आवास योजना, मेट्रो, योजना त्यांनी बंद केल्या. आपण लाडकी बहीण योजना आणली आहे. विरोधकांची रणनीती आहे की महिलांचे अर्ज भरून घ्यायचे आणि सरकारला ते द्यायचे नाही. ही योजना फसेल यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, असा गंभीर आरोपच फडणवीसांनी केला आहे.
फडणवीस म्हणाले, विरोधक किती लबाड आहेत बघा, या योजनेला सभागृहात विरोध करतात. कोर्टात जाण्याच्याही ते तयारी आहेत. आता गावागावात पहिले जाऊन पोस्टर आपलं लावतात. माझं कार्यकर्त्यांना सांगणे आहे की, ही योजना आपली आहे. ती जमिनीवर उतरली पाहिजे असे आवाहन फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
शेतकऱ्यांना वीज मोफत देतोय
मुलींना शंभर टक्के फी सवलत देण्याचे काम आमचे सरकार करत आहे. मुलींना उच्च शिक्षण घेता येईल. गृहिणींना तीन सिलेंडर मोफत देणार आहोत. गॅसची किंमत वाढवली असे ते बोलतात, पण ते तसे नाहीय. शेतकरी यांना वीज मोफत देतोय. कोणालाही पैसे लागणार नाहीत. जुने बीलही घेणार नाही. आम्ही पैसे उडवायला बसलो नाही. पुढच्या दोन वर्षात शेतकरी यांच्याकडे जाणारे युनिट हे सौर ऊर्जेचे असेल. तरूणांसाठी रोजगार योजना आणत आहोत. १० लाख तरूणांना आम्ही रोजगार देऊ. कौशल्य विकास योजना सुरू आहे.
फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्ह देण्याची व्यवस्था आपण करतोय
त्यांचा फेक नरेटिव्ह सुरू होता. सोशल मीडियावर ते चालवत होते. आज षडयंत्र केले जातेय. या मागे अनेक शक्ती आहेत. मोदी यांच्यासमोर कोणी टिकत नाही. म्हणून काही शक्ती विरोध करत आहेत. फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्ह देण्याची व्यवस्था आपण करतोय. आपले कार्यकर्ते किती आहेत. त्यांनी कामाला लागावे. प्रत्येकाने एक पोस्ट करावी. लोकप्रतिनिधी यांनी देखील काम करावे. तंत्रज्ञानावर लढाई सुरू आहे. जमिनीवर मेहनत करा, पण वर्च्युअल पण काम करा. गांभीर्याने घ्या आणि परिवर्तन होऊ शकते.