दहशत पसरवण्याच्या उद्देशाने पेरू विक्रेत्याचा विनाकारण खून; धायरीतील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 11:42 AM2023-06-14T11:42:05+5:302023-06-14T11:42:17+5:30
दहशत पसरवण्याच्या उद्देशाने तसेच वर्षभरापूर्वी झालेल्या भावाच्या हत्येचा बदला म्हणून विक्रेत्याचा विनाकारण खून
धायरी : दहशत पसरवण्याच्या उद्देशाने तसेच वर्षभरापूर्वी झालेल्या भावाच्या हत्येचा बदला म्हणून एका व्यक्तीचा विनाकारण खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राहुल चंद्रकांत आटोळे (वय ३६, रा. गोसावी वस्ती, नांदेडगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना हवेली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड फाटा येथील पेरू विक्रेता राहुल चंद्रकांत आटोळे यांच्या डोक्यात अज्ञात मारेकऱ्यांनी कोयत्याने वार करून खून केल्याचे रविवारी सकाळी समोर आले होते. आटोळे यांचे अगोदर कोणाशीही भांडण झाले नव्हते. तसेच अगोदर कोणत्याही गुन्ह्यात त्यांचा सहभाग नव्हता. त्यामुळे खून कोणी व का असावा याबाबत पोलिसांना उलगडा होत नव्हता. मात्र, याबाबत हवेली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, गेल्या वर्षभरापूर्वी नांदेड फाट्याजवळ एका भंगाराच्या दुकानात बसलेल्या सराईत गुन्हेगार मारुती ढेबे (वय २०) याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. यामध्ये नांदेड फाट्याजवळील गोसावी वस्ती येथील आरोपी होते.
ढेबे याच्या हत्येचा बदला म्हणून अल्पवयीन मुलांनी गोसावी वस्तीतील एकाला तरी संपवायचे असा निर्धार करून त्यांनी आटोळे यांचा खून केला. मात्र, ढेबे यांच्या खूनप्रकरणी आटोळे यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असा कोणताच संबंध नसल्याचे समोर येते आहे. फक्त गोसावी वस्तीत राहतो म्हणून त्यांचा खून करण्यात आला आहे. याबाबत हवेली पोलिसांनी तत्काळ तपास करून याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून एक आरोपी अद्याप फरार आहे. पुढील तपास हवेली पोलिस करीत आहेत.
चोवीस तासांत आरोपी ताब्यात; हवेली पोलिसांची कामगिरी
आटोळे यांचा खून कुणी केला असावा तसेच यातील मारेकरी कोण असावेत, हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास करून आरोपींची नावे निष्पन्न केली. त्यानंतर दोन अल्पवयीन मुलांना वेल्हे येथून ताब्यात घेण्यात आले. ही कामगिरी हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले, पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नीलेश राणे, विलास प्रधान, अशोक तारु, पोलिस नाईक राजेंद्र मुंढे, संतोष भापकर यांच्या पथकाने केली आहे.
बघ आपून काय केलंय....
रात्री नऊ वाजता राहुल आटोळे यांचा खून केल्यानंतर आरोपींनी मृतदेह झुडपात फेकून निघून गेले. रात्री दीड वाजता पुन्हा त्या ठिकाणी येऊन आरोपींनी मृतदेहाचे व्हिडीओ काढले व मित्राला इन्स्टाग्रामवर पाठवले. तसेच खाली मेसेजही केला की,'बघ आपून काय केलंय'. यावरून आरोपींनी जाणीवपूर्वक दहशत पसरविण्यासाठी अत्यंत निर्घृणपणे हा खून केल्याचे समोर येत आहे.