FTII च्या उपोषणास बसलेल्या एका विद्यार्थ्याची तब्बेत ढासळली; रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला
By नम्रता फडणीस | Published: May 19, 2023 05:05 PM2023-05-19T17:05:33+5:302023-05-19T17:13:27+5:30
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची स्थिती दिवसागणिक ढासळत असून एकाला तर तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता
पुणे : एफटीआयआय च्या 2020 च्या बँचमधील विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या बेमुदत उपोषणाच्या पाचव्या दिवशी एकाची आरोग्य स्थिती ढासळली असून, डॉक्टरांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. तरीही प्रशासन ढिम्मचं आहे. विद्यार्थी उपोषणास बसून पाच दिवस उलटले तरी अद्याप प्रशासनातील एकही व्यक्ती उपोषण स्थळी फिरकलेली नसल्याचे स्टुडंट असोसिएशनचे म्हणणे आहे.
एफटीआयआयमधील 2020 बँचच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षातील अनुपस्थिती आणि अपेक्षित क्रेडिट नसणे या कारणास्तव संस्थेने पाच विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ त्या वर्षातील विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषणाचे शस्त्र उपसले असून, गेल्या पाच दिवसांपासून काही विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. विद्यार्थ्याला 2020 च्या शैक्षणिक वर्षात समाविष्ट करुन घ्यावे, प्रशासनाने प्रॉक्टर नोटीस मागे घ्यावी आणि उपोषण स्थगित झाल्यानंतर तातडीने नोटीस दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम सुरु करावा तसेच इन्स्टिट्यूटमध्ये एस/एसटी सेल व मानसिक आरोग्य सेल स्थापन करावा अशा मागण्यांसाठी त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे.
एफटीआयआय प्रशासनाने येत्या 30 मे ला शैक्षणिक परिषदेची बैठक आयोजित केली आहे. मात्र त्याला खूप कालावधी बाकी आहे. त्यांचे आरोग्य बघता हा प्रश्न प्रशासनाने तातडीने सोडविण्याची गरज आहे. प्रशासनाने विद्यार्थ्यांप्रती सहानुभूती दाखवावी आणि त्यांची भेट घ्यावी. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची स्थिती दिवसागणिक ढासळत आहे. एका विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. 2020 च्या बँचमधील अजून दोन विद्यार्थी शुक्रवारपासून उपोषणाला बसले असल्याची माहिती असोसिएशनतर्फे देण्यात आली आहे.