Heart Transplant: पुण्यातील महिलेच्या शरीरात धडधडणार दिल्लीतील माजी सैनिकाचे हृदय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 03:34 PM2023-02-13T15:34:02+5:302023-02-13T15:34:14+5:30
ब्रेन डेड झालेल्या ४० वर्षीय माजी सैनिकाचे हृदय दिल्लीहून विशेष विमानाने थेट पुण्यात
पुणे : रस्ता अपघातात गंभीर जखमी व नंतर ब्रेन डेड झालेल्या ४० वर्षीय माजी सैनिकाचे हृदय दिल्लीहून विशेष विमानाने थेट पुण्यात आणण्यात आले. व ते हृदय एका सैनिकाच्या २९ वर्षीय पत्नीवर प्रत्याराेपित करण्यात आले. ही संपूर्ण क्रिया अवघ्या चार ते पाच तासांत पूर्ण करण्याचे आव्हान ग्रीन कॉरिडॉर आणि पोलिसांमुळे पेलणे शक्य झाले. प्रत्याराेपणाची शस्त्रक्रिया शनिवारी (दि. ११) आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेसमध्ये (एआयसीटीएस) यशस्वीपणे पार पडली. अवघ्या दाेन आठवड्यांत ‘एआयसीटीएस’मध्ये हृदय प्रत्याराेपणाची ही दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
अवयवदाता हा माजी सैनिक असून, त्याला मध्य प्रदेशातील भिंड येथे ८ फेब्रुवारीला दुचाकीने धडक दिल्याने डाेक्याला गंभीर जखम झाली हाेती. नंतर उपचारासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते व व्हेंटिलेटवर उपचार सुरू हाेते. दुसऱ्या दिवशी या सैनिकाला दिल्लीतील ‘आर्मी हाॅस्पिटल रिसर्च अँड रेफरल’ सेंटरमध्ये हलवण्यात आले. दरम्यान, डाेक्याला गंभीर जखम असल्याने त्याला ११ तारखेला डाॅक्टरांच्या पथकाने ब्रेन डेड घाेषित केले. दरम्यान, या माजी सैनिकाच्या कुटुंबाने त्याच्या हृदयासह इतर अवयवदान करण्याची स्वत:हून तयारी दर्शवली.
भारतीय सैन्य दलात सेवेत असलेल्या सैनिकाच्या २९ वर्षीय पत्नीचे हृदय अत्यंत कमकुवत झाले हाेते व त्यावर हृदय प्रत्याराेपण हाच एकमात्र उपाय हाेता. ‘डायलेटेड कार्डिओमायाेपॅथी’ या हृदयाच्या आजाराने पीडित असलेल्या या महिला रुग्णावर ‘एआयसीटीएस’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून उपचार सुरू हाेते आणि ते एका हृदयाच्या प्रतीक्षेत हाेते. ताेपर्यंत या महिला रुग्णाच्या हृदयाचे कार्य सुरू राहण्यासाठी हृदयाला शाॅक देणारे एक विशेष इम्प्लांट बसवण्यात आले हाेते.
दरम्यान, माजी सैनिकाचे हृदय सैनिकाच्या पत्नीला वैद्यकीयदृष्ट्या बसू शकत असल्याची खात्री झाल्यानंतर ते हृदय दिल्लीवरून पुण्यात घेऊन येणे आव्हानाचे हाेते. कारण हृदय अवयदात्याच्या शरीरातून काढल्यानंतर त्याचे प्रत्याराेपण अवघ्या चार ते पाच तासांत हाेणे गरजेचे असते. मात्र, सैन्य दलाच्या यंत्रणेने हे आव्हान पेलले आणि ते यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
पुण्यातील दक्षिण मुख्यालयातील वैद्यकीय पथकाने वेस्टर्न एअर कमांडच्या साहाय्याने हे हृदय पुण्यात इम्ब्राअर जेट या विशेष विमानाने पुण्यातील लाेहगाव विमानतळावर आणले. तेथून ते काही मिनिटांतच ग्रीन काॅरिडाॅरद्वारे एआयसीटीएसमध्ये दाखल झाले. त्यासाठी दिल्ली, महाराष्ट्र पाेलिस दलाची मदत झाली. ‘एआयसीटीएस’मधील हृदयशल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख व भूलतज्ज्ञांनी हे हृदय काही तासांतच ११ फेब्रुवारीला सैनिकाच्या पत्नीवर प्रत्याराेपित केले. ही महिला सध्या आयसीयूमध्ये असून, प्रत्याराेपित केलेले हृदय धडधडत आहे.
दाेन आठवडयांत दाेन हृदयप्रत्याराेपण
दाेन आठवड्यांपूर्वी म्हणजे ३० जानेवारीला इंदौरवरून एक हृदय पुण्यातील ‘एआयसीटीएस’ येथे आणले हाेते व एका सैन्यदलात सेवेत असलेल्या रुग्णावर प्रत्याराेपित केले हाेते, अशी माहिती सैन्यदलाच्या वतीने देण्यात आली.