उन्हाचा चटका वाढला, राज्यात पावसाची शक्यता!
By श्रीकिशन काळे | Published: February 10, 2024 03:40 PM2024-02-10T15:40:24+5:302024-02-10T15:40:50+5:30
सध्या राज्यामध्ये पावसाला पोषक हवामानाची स्थिती असून, किमान तापमानात वाढ होत आहे
पुणे : राज्यात व पुणे शहरात किमान तापमानात वाढ होत असल्याने उकाडा जाणवत आहे. सकाळी काही प्रमाणात थंडी पडत आहे. दुपारी मात्र उकाड्यात चांगलीच वाढ होताना दिसून येत आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
हवेची चक्रीय स्थिती दक्षिण गुजरात व लगतच्या भागावर आहे. हवेचा पट्टा मध्य महाराष्ट्रापासून अरबी समुद्रात जात आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागाराहून आर्द्रता घेऊन वारे वाहणार आहेत. मध्य महाराष्ट्रातील जळगावात ११ फेब्रुवारीला पावसाची शक्यता आहे. तसेच औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, परभणी येथे देखील पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही विजांचा कडकडाट होऊन पाऊस होऊ शकतो. दरम्यान पुणे परिसरात आकाश निरभ्र राहणार आहे. ११ फेब्रुवारी रोजी ढगाळ वातावरण राहील. सध्या राज्यामध्ये पावसाला पोषक हवामानाची स्थिती असून, किमान तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत आहे. विदर्भासह मराठवाड्यात आज विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका अद्याप कायम आहे. हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये थंडीची लाट आहे.
पुणे शहरातील किमान तापमान
हवेली : ११.१
शिवाजीनगर : १२.४
लवासा : १३.०
पाषाण : १३.६
लोणावळा : १४.४
हडपसर : १५.९
कोरेगाव पार्क : १७.५
मगरपट्टा : १९.२
वडगावशेरी : २०.२