Temperature: उन्हाचा चटका वाढतोय; करा 'हे' उपाय अन् उष्माघाताचा धाेका टाळा
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: April 12, 2023 04:05 PM2023-04-12T16:05:41+5:302023-04-12T16:05:49+5:30
उष्माघातामध्ये ताप येतो, डोके दुखते, डोळ्यांची आग हाेते, खूप तहान लागते आणि डाेळयासमाेर अंधारी येते
पुणे : उन्हाचा चटका वाढला आहे. मध्येच पावसाच्या सरी बरसत असल्या तरी दुपारी उशिरापर्यंत उन्हाचा चटका मात्र पाठ साेडत नाही. तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. अशा रणरणत्या उन्हात अंगाची काहीली हाेते. तसेच शरीरात पाण्याचे प्रमाणही कमी हाेते आणि जर भर उन्हात काही काम केले तर कदाचित उष्माघाताची शक्यताही वाढते. हा उन्हाळा सुसहय हाेण्यासाठी थाेडी फार जरी काळजी घेतली तरी ताे सुसहय हाेउ शकताे.
कडक उन्हाच्या वेळी घरातून शक्यताे बाहेर पडू नये. परंतू, जर हे टाळणे अशक्य असेल तर उन्हाळयात दुचाकीवरून प्रवास करताना, तसेच बाहेर फिल्डवरील काम असेल तर ते उन्ह लागतेच. अशा वेळी शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी हाेते. त्यामुळे तहान लागते व ताेंड काेरडे पडते. हे टाळण्यासाठी दुचाकीवरून प्रवासाला निघताना डाेक्यात हेल्मेट, टाेपी किंवा रूमाल बांधावा. तसेच डाेळयांना उन्हाचा त्रास न हाेण्यासाठी सनग्लास घालावा. साेबत पाण्याची बाटली हमखास ठेवावी. दुरचा प्रवास करताना तर या गाेष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत.
उन्हात घाम येत असताे ताे खरे तर शरीराला थंड ठेवण्याचे काम करत असताे. म्हणून घाम येणे ही प्रक्रिया शरीर थंड ठेवण्यासाठी असते. बहुतेक वेळा घाम न आल्याने शरीराचे तापमाण वाढते आणि मग उष्माघाताचीही शक्यता वाढते. जर एखादयाला उन्हामुळे चक्कर आली तर त्याला झाडाच्या सावलीला किंवा थंड वातावरणात शांत झोपवावे. तसेच त्याचे अंग पाण्याने पुसून घ्यावे आणि पाणीही प्यायला दयावे. काही वेळ विश्रांती घ्यावी. यानंतरही बरे वाटत नसेल तर डाॅक्टरांना दाखवावे.
जेव्हा भर उन्हात काम केले जाते त्यावेळी हा त्रास हाेताे. यामध्ये लघवीच्या वेळी जळजळ होते. हे शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे लघवीत उष्णता निर्माण होते आणि लघवीच्या जागेत दाह होतो. त्यालाच मूत्राघात असेही म्हणतात. हा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी दिवसातून तीन ते चार वेळा लिंबू सरबत अवश्य प्यावे. तसेच नारळपाणी, कोकम सरबतही वरचेवर घ्यावे. एक चमचा जिरं-एक चमचा धने ग्लासभर पाण्यात रात्री भिजत घालून सकाळी हे मिश्रण गाळून पिल्याने आराम पडताे असा सल्ला ज्येष्ट आयुर्वेदतज्ज्ञ डाॅ. भीम गायकवाड यांनी दिला.
उष्माघात म्हणजे काय?
उन्हाळयात जर उन्हात काम केल्यास उष्माघाताची शक्यता वाढते. उष्माघातामध्ये ताप येतो, डोके दुखते, डोळ्यांची आग हाेते, खूप तहान लागते आणि डाेळयासमाेर अंधारी येते. यामध्ये शेतीकाम करणारे मजूर, उन्हात फिरणारे विक्रेते यांच्यामध्ये हे प्रमाण दिसून येते. उष्माघातामध्ये शरीराचे उष्णतेचे संतुलन करणारी यंत्रणा निकामी हाेते.
उन्हापासून असा करा बचाव
- उन्हात बाहेर पडताना डाेक्यात टाेपी, रूमाल घालावा
- शक्यताे सफेद कपडे घालावेत, काळे कपडे प्रकाश शाेषून घेत असल्याने ते घालू नयेत.
- वारंवार पाणी, लिंबू सरबत, लस्सी, वाळा - सरबत, असे द्रव पदार्थाचे प्रमाण वाढवावे.
- उन्हातून आल्यावर लगेच फ्रीजचे थंड पाणी पाणी पिऊ नका. ताप असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्या.