उन्हाचा चटका वाढला! पुण्यात पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता
By नितीन चौधरी | Published: April 7, 2023 01:46 PM2023-04-07T13:46:36+5:302023-04-07T13:46:46+5:30
शहरात तापमानाचा पारा चाळीसच्या आसपास
पुणे : सकाळी पावसाच्या हलक्या सरी, दुपारी उन्हाचा चटका अन् सायंकाळी पुन्हा हलक्या सरी असे विषम वातावरण गुरुवारी (दि. ६) शहरात होते. ढगाळ वातावरण असूनही शहराच्या पूर्व भागात तापमान चाळीशीत पोहोचले होते. येत्या दोन दिवसात शहरात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा व हलक्या पावसाची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले.
पुढील चार दिवसांतही सायंकाळी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. शनिवारी विदर्भ व मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात उन्हाचा चटका वाढल्याचे जाणवत आहे. परिणामी वडगाव शेरी व कोरेगाव पार्क भागात तापमान चाळीशीला पोहोचले आहे.
कोरेगाव पार्क भागात बुधवारी कमाल तापमानाचा पारा ३९.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. तर लवळे व वडगाव शेरीचे तापमान ३९ अंश सेल्सिअस होते तर शिरूरमध्ये तापमान ४०.२ अंशांवर पोहोचले होते. गुरुवारी त्या तुलनेत सकाळी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उन्हाच्या चटक्यापासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा असतानाचा दुपारी सूर्य चांगलाच तळपला. शहराच्या पूर्व भागात पुन्हा तापमान चाळीशीपर्यंत पोहोचले. वडगाव शेरीत ३९.५ तर कोरेगाव पार्कात ३९.४ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. त्यानंतर सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले. शहराच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झाला.
दुसरीकडे बुधवारी किमान तापमानातही वाढ झाल्याचे दिसून आले. शिवाजीनगरमध्ये १८.२ तर हडपसरमध्ये २३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. गुरुवारीही वडगाव शेरीत किमान तापमान २५ अंशांवर पोहोचले होते. हडपसरमध्ये २४.३, तर लवळे येथे २४.४ इतके नोंदविण्यात आले. शिवाजीनगरमध्ये हेच तापमान १७.५ अंश सेल्सिअस होते.
पुढील दोन दिवस यलो अलर्ट
हवेतील विसंगतीमुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरावरून राज्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. दिवसाचे तापमान वाढले असल्याने सायंकाळी ढगाळ वातावरणाचा अनुभव येत आहे. त्यामुळे हवामान विभागाने शहरासाठी पुढील दोन दिवसात ‘यलो अलर्ट’ दिला आहे. त्यात मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह अति हलका ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतरचे चार दिवस आकाश सकाळी मुख्यत्वे निरभ्र राहून सायंकाळी अंशत: ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
विदर्भ, मराठवाड्यात शनिवारी ऑरेंज अलर्ट
राज्यात शुक्रवारी वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. पालघर, ठाणे व रायगड वगळता अन्य जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. शनिवारी दक्षिण मराठवाड्याचे लातूर, धाराशिव व नांदेड वगळता राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ असेल. रविवारी मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर व मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीडमध्ये ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.