उन्हाचा चटका तीव्र; विद्यार्थ्यांची पावले पोहण्याकडे अन् महापालिकेचे १० जलतरण तलाव बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 10:55 IST2025-04-03T10:54:28+5:302025-04-03T10:55:13+5:30

उन्हाचा चटका वाढल्याने जलतरण तलावावर पाेहण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी वाढत असून त्यातच महापालिकेचे दहा जलतरण तलाव विविध कारणांमुळे बंद आहेत

The heat of the summer is intense students are taking to swimming and 10 pune municipal swimming pools are closed | उन्हाचा चटका तीव्र; विद्यार्थ्यांची पावले पोहण्याकडे अन् महापालिकेचे १० जलतरण तलाव बंद

उन्हाचा चटका तीव्र; विद्यार्थ्यांची पावले पोहण्याकडे अन् महापालिकेचे १० जलतरण तलाव बंद

पुणे: सध्या उन्हाचा चटका तीव्र झाल्याने नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची पावले पोहण्यासाठी जलतरण तलावांकडे वळतात. मात्र, महापालिकेच्या ३५ जलतरण तलावांपैकी १० जलतरण तलाव नादुरुस्त असल्याने बंद आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. महापालिकेने शहराच्या विविध विभागांत ३५ जलतरण तलाव निर्माण केले आहेत. उन्हाचा चटका वाढल्याने जलतरण तलावावर पाेहण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी वाढत आहे. त्यातच महापालिकेचे दहा जलतरण तलाव विविध कारणांमुळे बंद आहेत. 

शहराच्या मध्यवर्ती भागातील शनिवार पेठेत असलेले न. वि. गाडगीळ जलतरण तलावाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले; पण ताे अद्याप सुरू झाला नाही. कात्रज येथील शंकरराव कदम क्रीडा संकुलातील जलतरण तलावाच्या दुरुस्तीचे कामाची निविदा धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाकडून काढण्यात आली असून, हा जलतरण तलाव सुरू करण्यात आला आहे. शिवाजीनगर येथील आमदार शिवाजीराव भाेसले जलतरण तलाव, येरवडा येथील केशवराव ढेरे जलतरण तलाव, पाषाण येथील भारतरत्न डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जलतरण तलाव, औंध गाव येथील जलतरण तलाव, हडपसर येथील खासदार विठ्ठलराव तुपे क्रीडा संकुलातील जलतरण तलाव हे दुरुस्तीमुळे बंद आहेत. यामुळे या भागातील नागरिकांची गैरसाेय होत आहे.

घाेरपडी येथील नारायण तुकाराम कवडे-पाटील जलतरण तलावाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, अद्याप करारनामा न झाल्याने ताे बंद आहे. सहकारनगर येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलातील जलतरण तलावाची निविदा प्रक्रिया झाली नाही, त्यामुळे ताे बंद आहे. बावधन येथील स्वामी विवेकानंद जलतरण तलाव व व्यायामशाळेचे मूल्यांकन झाले नाही, त्यामुळे पुढील प्रक्रिया झालेली नाही. शिवदर्शन येथील जलतरण तलाव व क्रीडा संकुलाच्या संदर्भात न्यायालयीन वाद आणि दुरुस्तीमुळे बंद ठेवण्यात आला आहे.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व जलतरण तलावांची पाहणी करण्यात आली आहे. पाेहण्यासाठी येणाऱ्यांची सुरक्षितता, पाण्याची गुणवत्ता आदींसंदर्भात संबंधित जलतरण तलाव चालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. - किशोरी शिंदे, उपायुक्त, क्रीडा विभाग, महापालिका.

Web Title: The heat of the summer is intense students are taking to swimming and 10 pune municipal swimming pools are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.