Rain In Pune: दिवसा उन्हाच्या झळा अन् सायंकाळी वरुणराजाचे आगमन; पुण्यात मुसळधार पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 07:54 PM2023-04-11T19:54:17+5:302023-04-11T19:54:28+5:30
पुणेकर तापमान वाढल्याने घामेघूम मात्र सायंकाळनंतर वरूणराजाच्या आगमनाने दिलासा
पुणे : शहराला मंगळवारीही पावसाने चांगलेच झोडपले. दिवसभर पुणेकर किमान व कमाल तापमान वाढल्याने घामेघूम झाले होते. परंतु, सायंकाळनंतर मात्र वरूणराजाच्या आगमनाने दिलासा मिळाला. कात्रज आंबेगावला ८ मिमी, खडकवासला ९.८ व वारज्यात ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कोथरूड परिसरात काही ठिकाणी गाराही पडल्या.
गेल्या चार-पाच दिवसांपासून पुण्यात ढगाळ वातावरण आहे. दिवसा प्रचंड गरमी होत असून, सायंकाळनंतर पाऊस हजेरी लावत आहे. मंगळवारी सकाळपासूनच उकाडा अधिक होता. शहरातील कमाल तापमानाचा आकडा चाळीशीमध्ये पोचला होता. त्यामुळे घराबाहेर पडल्यानंतर उन्हाच्या झळया अंगाला झोंबत होत्या. तसेच किमान तापमानही २० अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने पुणेकरांच्या अंगाची लाहीलाही झाली. वडगावशेरी, लवळे, चिंचवड, मगरपट्ट, कोरेगाव पार्क या परिसरातील किमान तापमान २४-२५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. तर कमाल तापमानात सवार्धिक कोरेगाव पार्कमध्ये तापमानाचा पारा ४२ वर गेला होता. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आकाश भरून आले आणि ढगांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुणेकरांची चांगली तारांबळ उडाली.
पुढील पाच दिवस अजून दुपारी आकाश निरभ्र असेल आणि सायंकाळनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
पुणे किमान तापमान
वडगाव शेरी : २५.९
मगरपट्टा : २४.९
कोरेगाव पार्क : २३.८
एनडीए : २०
शिवाजीनगर : १९.९
पाषाण : १८.९
पुणे कमाल तापमान
कोरेगाव पार्क : ४२.१
वडगावशेरी : ४०.६
मगरपट्टा : ३९.४
शिवाजीनगर : ३८.६
एनडीए : ३८.५
पाषाण : ३८