निर्लज्जपणाचा कळस गाठला! तरीही दीनानाथ रुग्णालय म्हणतंय, कुटुंबीयांकडून आमची नाहक बदनामी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 10:38 IST2025-04-05T10:36:46+5:302025-04-05T10:38:37+5:30

शहरातील इतर धर्मदाय रुग्णालयांमध्ये देखील सामान्यांना अवहेलनात्मक वागणूक मिळत असल्याने दीनानाथ रुग्णालयाविरुद्ध संताप व्यक्त होतोय

The height of shamelessness has been reached Yet Dinanath Hospital is saying We are being undeservedly defamed by our family | निर्लज्जपणाचा कळस गाठला! तरीही दीनानाथ रुग्णालय म्हणतंय, कुटुंबीयांकडून आमची नाहक बदनामी!

निर्लज्जपणाचा कळस गाठला! तरीही दीनानाथ रुग्णालय म्हणतंय, कुटुंबीयांकडून आमची नाहक बदनामी!

पुणे : गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी शहरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. दीनानाथ रुग्णालयाच्या अमानुष कृत्याबाबत निषेध व्यक्त केला जात आहे. निष्पाप नवजात बाळांची आई हिरावून घेतलेले दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने निर्लज्जपणाचा कळस गाठला असून, मृत महिलेच्या कुटुंबीयांकडून आमची नाहक बदनामी झाली, असे सांगत आहे.

घडलेल्या प्रकाराबाबत सरकारला अहवाल सादर करत आपली बाजू मांडली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, दि. २८ मार्चच्या दुपारनंतर रुग्णाचे काय झाले याबद्दल डॉ. घैसास व रुग्णालय प्रशासनास काहीच कल्पना नाही. भिसे कुटुंबीयांकडून रुग्णालयाची नाहक बदनामी केली आहे, असा आरोपही रुग्णालयाने केला आहे. गर्भवती मृत्यूप्रकरणी शासनाकडून आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची चौकशी नेमली आहे. यात डॉ. प्रशांत वाडीकर, डॉ. नागनाथ यम्पल्ले, डॉ. नीना बोराडे, डॉ. कल्पना कांबळे आदींचा समावेश आहे.

उपचारासाठी १० ते २० लाखांच्या खर्चाची कल्पना

रुग्ण, पती व नातेवाईक शुक्रवार, दि. २८ मार्च रोजी सकाळी ११:३० वाजता डॉ. घैसास यांच्या बाह्यरुग्ण विभागात आले होते. तपासणीवेळी रुग्णाची प्रकृती सामान्य होती. कुठल्याही तातडीच्या उपचाराची गरज नव्हती. तरीही जोखमीची अवस्था लक्षात घेता देखरेखीकरिता रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला. ७ महिन्यांची जुळी मुले, जुन्या आजाराची गुंतागुंत, सिझेरियन विभागातील उपचारासाठी १० ते २० लाखांच्या खर्चाची कल्पना दिली. यावर तुम्ही भरती करून घ्या, मी प्रयत्न करतो, असे सांगत महिलेच्या पतीने डॉ. केळकर यांना फोन करून आपली अडचण सांगितली. त्यावर डॉ. केळकर यांनी जमतील तेवढे पैसे भरा, मी डॉ. घैसास यांना सांगतो, असे सांगितले.

धर्मदाय रुग्णालयांमध्ये देखील सामान्यांना अवहेलनात्मक वागणूक 

रुग्णाचा कोणीही नातेवाईक प्रशासन अथवा चॅरिटी डिपार्टमेंटला प्रत्यक्ष भेटला नाही. पैशांची तजवीज न झाल्यास रुग्णाला ससून येथे दाखल करण्याचा सल्ला दिला होता. गुंतागुंतीची शस्त्रक्रिया व अपुऱ्या वाढीच्या गर्भाची शुश्रूषा ससूनच्या सिझेरियन विभागात व्यवस्थित होईल. नातेवाईक रुग्णाला घेऊन गेल्याचे समजताच डॉ. घैसास यांनी रुग्णाच्या पतीला फोन केला. तो त्यांनी उचलला नसल्याचे रुग्णालयाने अहवालात म्हटले आहे. रुग्णालयाचा खुलासा आणि घडलेली घटना पाहता डॉक्टर आणि वैद्यकीय रुग्णालये सेवाधर्माला विसरल्याचेच दिसत आहे. शहरातील इतर धर्मदाय रुग्णालयांमध्ये देखील सामान्यांना अवहेलनात्मक वागणूक मिळत असल्याने दीनानाथ रुग्णालयाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.

लाेकमत भूमिका

जगाला विश्वात्मकतेचा, माणुसकीचा संदेश देणाऱ्या संतांच्या, समाजसुधारकांच्या, आयटीएन्सच्या भूमीत आता माणुसकीच पाेरकी हाेत असल्याचे विदारक चित्र समाेर येत आहे. याच पुण्यातील तथाकथित प्रतिष्ठित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांच्या हव्यासातून एका गर्भवती महिलेला उपचार करण्यास नकार दिला आणि रुग्णवाहिकाही वेळेवर मिळू न शकल्याने या महिलेने निरागस दाेन बाळांना जन्म देऊन प्राणज्याेत मालवली. ही घटना ऐकली तरी अंगावर काटा येताे. यात निष्पाप बाळांची आई हिरावली गेली, त्याला जबाबदार काेण? सरकार, रुग्णालय प्रशासन की गरिबी? हा खरा प्रश्न आहे. यात सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षांनीही आक्रमक पवित्रा घेत रुग्णालयाची ताेडफाेड करत आंदाेलन केले. पण याने त्या बाळांची आई परत येणार आहे का? घटना घडल्यानंतर प्रतिक्रिया देण्याऐवजी अशी वेळ काेणावर येऊ नये, म्हणून सरकारी आराेग्य यंत्रणा सक्षम कधी करणार, धर्मादाय रुग्णालयांचे बाजारीकरण काेण थांबविणार? काेराेना संकटाने डाेळ्यात अंजन घालून जागे केल्यानंतरही आपण निद्रेत कसे गेलाे? आता तरी जागे हाेऊ, पुढील अनर्थ टाळू.

Web Title: The height of shamelessness has been reached Yet Dinanath Hospital is saying We are being undeservedly defamed by our family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.