कात्रज भागातील डोंगर पोखरून उभं राहतंय सिमेंटचे जंगल; निसर्गसौदंर्याला तडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 09:31 PM2022-09-27T21:31:49+5:302022-09-27T21:32:22+5:30
कात्रज भागात गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, जोराळा, पुणे खिंड, खंडोबा माळ, चिमणीचा खडा, वाघजाई खोरे, आग्याचा कडा अशा डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या डोंगर रांगा
संतोष गाजरे
कात्रज : कात्रज भागात गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, जोराळा, पुणे खिंड, खंडोबा माळ, चिमणीचा खडा, वाघजाई खोरे, आग्याचा कडा अशा डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या डोंगर रांगा आहेत. कात्रजच्या सौंदर्याला भर पाडणाऱ्या याच डोंगरांचे आता लचके तोडले जात आहेत. या भागातील डोंगर पोखरले असून, उतारांवर उंचच उंच इमारती, हॉटेल्स उभारली जाणार असल्याने सिमेंटचे जंगल होणार का? असा शकेल नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
महापालिका हद्दीत नव्याने झोन घोषित करून प्रशासनाकडून नियम आणले गेले. परंतु याला फाट्यावर मारले जात आहेत. हिल टॉप, हिल स्लोप, ग्रीन झोन, तर काही ठिकाणी बीडीपी अशा ठिकाणी डोंगर फोडून बांधकामे केली जात आहेत. परंतु यामुळे उद्भवणाऱ्या संकटांची भीतीच कोणाला राहिलेली दिसत नाही. परिणामी, २०१९ ला आलेल्या पुरासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत अनेक पर्यावरण अभ्यासकांनी काळजीही व्यक्त केली आहे. तरी सुद्धा महानगरपालिका व संबंधित प्रशासन ‘बीडीपी’, हिल टॉप, हिल स्लोप झोनमधील अतिक्रमणांचे गांभीर्य घेताना दिसत नाही. त्यामुळे कात्रज व भागांतील टेकड्यांवरील अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत. सर्रासपणे येथील डोंगरावर दिवसाढवळ्या जेसीबी, पोकलेन, लावून ठिकठिकाणी टेकड्या फोडण्याची कामे सुरू आहेत. टेकड्यांच्या उतारावर भराव टाकणे सुरू आहे. यातील टेकड्या 'बीडीपी', हिल टॉप, हिल स्लोप, ग्रीन झोनच्या हद्दीतील आहेत, हे माहिती असतानाही त्याकडे महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. स्थानिक लोकांनी तक्रारी करूनही परिस्थिती बदलत नाही.
महापालिकेवर प्रशासन असल्याने अधिकारीदेखील इकडे फिरकायला तयार नाहीत. अतिक्रमने फोफावली आहेत. मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्यानंतर प्रशासनाला जाग येते. तर कारवाई दिखाव्यापुरती केली जाते, असा आरोपच काही नागरिक करीत आहेत.
दक्षिण पुण्यातील कात्रजपासून अगदी हाकेच्या अंतरावर डोंगररांगेत वसलेले 'कोळेवाडी' गाव आहे. दत्तनगर चौकापासून जेमतेम ६ किलोमीटरचे अंतर लोकसंख्या ६०० ते ७०० च्या आसपास त्यात आदिवासींची संख्या जास्त अनेक दिवसांपासून हे गाव अनेक समस्यांनी ग्रासले आहे. असे असताना मात्र कोळेवाडीच्या आजूबाजूने असणाऱ्या डोंगरावर सिमेंटचे जंगल उभारले जात आहे. मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरून इमारती उभ्या राहत आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे गावकरी वाढत्या अतिक्रमणाची तक्रारी करीत आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी देखील ग्रामस्थांनी मागणी केली. कोळेवाडी गावास गावठाणचा दर्जा मिळावा यासाठी देखील गावकरी आग्रही आहेत.
''अवैध उत्खननाबाबत आम्ही वेळोवेळी नोटिसा काढत असतो, तसेच पंचनामे देखील असतात. याअगोदर अशी आम्ही कारवाई करून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल केला आहे. - तृप्ती कोलते, तहसीलदार, हवेली.''
''डोंगर भागात प्रचंड प्रमाणात वृक्षतोड करून सिमेंटची जंगले उभारली जात आहेत. वृक्षतोड केल्याने जमिनी उघड्या पडतात. त्यामुळे पाऊस झाल्यानंतर पावसाचे पाणी न मुरता ते खाली वाहत जाते. त्याऐवजी जर झाडे-झुडपे असतील तर ते अडते व मुरते. परंतु झाडे नसल्याने ते वाहत जाऊन परिणामी पूर यासारख्या समस्या वाढतात. वृक्षतोडीमुळे जमिनीतील पाण्याची क्षमता वाढत नाही. त्याचा प्रचंड मोठा परिणाम होतो. डोंगर, टेकड्या हे नैसर्गिक पद्धतीने पाणी साठवून ठेवतात. परंतु डोंगराचे लचके तोडल्याने याची हानी होते व दुष्परिणाम भोगावे लागतात.- सारंग यादवडकर, पर्यावरण तज्ज्ञ''
''अनधिकृत बांधकामावर महापलिका व महसूल विभाग यांनी एकत्रित कारवाया कराव्यात. सर्वप्रथम राज्य शासनाकडून हिल टॉप, हिल स्लोपबाबत ताबडतोब निर्णय घेण्यात यावा. गोरगरिबांची फसवणूक होत आहे. अशा प्रकारची फसवणूक होता कामा नये. योग्य ती खबरदारी घेऊन जमिनी घ्याव्यात.- विशाल तांबे, सदस्य, पीएमआरडी''