श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी माऊलींच्या पालखीतील मानाचे अश्व नतमस्तक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 08:43 PM2023-06-09T20:43:25+5:302023-06-09T20:44:24+5:30
गणपती बाप्पा मोरया..माऊली.. माऊली..च्या जयघोषाने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला
पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाचे अश्वराज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करीत गणराया चरणी नतमस्तक झाले. गणपती बाप्पा मोरया... माऊली माऊली च्या जयघोषाने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अश्वांचे पूजन करीत निर्मल वारी - हरित वारी करिता श्री गणेश आणि माऊली चरणी प्रार्थना केली. तसेच मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
कर्नाटक बेळगाव मधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या हिरा-मोती या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले.
महादजी राजे शितोळे सरकार म्हणाले, गणपती बाप्पाच्या दर्शनाने ऊर्जा मिळते. त्या ऊर्जेने वारीमध्ये पुढे चालत जात असतो. बाप्पाचे असेच आशिर्वाद कायम वारक-यांवर असावे. दरवर्षी सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे. काही वर्षांपूर्वी या प्रवासात मंदिरा बाहेरुन गणरायाचे दर्शन होत असे. मात्र, आता अश्वांनी गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना दिली असून ही शुभ गोष्ट आहे. आता श्रीगणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आळंदीकडे प्रस्थान करतील. ज्यांना या वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतात.
माणिक चव्हाण म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून हे अश्व मंदिराच्या सभामंडपात येऊन गणरायाला मानवंदना देत आहेत. वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. ट्रस्टतर्फे वारी अंतर्गत हरित वारी, स्वच्छता अभियान, रुग्णवाहिका सेवा, आरोग्य तपासणी, भोजन सेवा अनेक उपक्रम राबविले जातात. त्या सर्व उपक्रमांची सुरुवात या कार्यक्रमाने होत असून ट्रस्ट नेहमीच वारक-यांच्या सेवेत नानाविध उपक्रम राबवित राहिल.