जिल्हाधिकाऱ्यांचे नियुक्तीचे बनावट पत्र देऊन हॉटेल मॅनेजरला घातला २८ लाखांचा गंडा
By विवेक भुसे | Published: April 3, 2024 09:24 AM2024-04-03T09:24:02+5:302024-04-03T09:24:23+5:30
महसुल विभागात ८७ जागा भरायच्या आहेत, मी मंत्रालयातून तुमचे काम करुन देतो, असे सांगून त्यांना विविध आमदारांच्या ओळखी असल्याचे मॅनेजरला सांगितले.
पुणे: हॉटेलमध्ये उतरलेल्या आमदार, मंत्र्यांची ओळख सांगून महसुल विभागात नोकरी देतो, असे चोरट्याने आमिष दाखविले. पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे बनावट नियुक्तीपत्र देऊन २८ लाख ७८ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी उरुळी कांचन येथील एका ३३ वर्षाच्या नागरिकाने विमानतळ पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलिसांनी सिद्धार्थ देविदास झेंडे (वय ३५), त्याची पत्नी सीमा सिद्धार्थ झेंडे (रा. म्हसोबावाडी, इंदापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एअरपोर्ट रोडवरील मॅग्नेस स्क्वेअर बिजनेस हॉटेलमध्ये २६ फेब्रुवारी ते १५ मार्च दरम्यान घडली.
फिर्यादी हे हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. सिद्धार्थ झेंडे हे त्यांच्या हॉटेलमध्ये उतरले होते. महसुल विभागात ८७ जागा भरायच्या आहेत, मी मंत्रालयातून तुमचे काम करुन देतो, असे सांगून त्यांना विविध आमदारांच्या ओळखी असल्याचे सांगितले. त्याने व त्याच्या पत्नी फिर्यादी यांना मुंबईला मंत्रालयात नेले. आमदार निवासात काही आमदारांची ओळख असल्याचे दाखवून दिले. नोकरीसाठी ३० लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. फिर्यादी यांनी नातेवाईकांकडून पैसे जमा करुन २८ लाख ७८ हजार रुपये झेंडे यांना दिले. त्यानंतर त्यांनी महसुल विभागाचे सहायक लिपिक पदाचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती केल्याचे पत्र दिले. ते पत्र घेऊन फिर्यादी हे जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता ते बनावट असून अशी कोणतीही नियुक्ती झाली नसल्याचे समजले. ही बाब सिद्धार्थ झेंडे याला समजल्यावर तो बील न भरता पळून गेला. दरम्यान, झेंडे वापरत असलेल्या कारचा मालक हॉटेलमध्ये आला. त्याने झेंडे याने १४ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश देऊन कार घेतल्याचे सांगितले. हा धनादेश पैसे नसल्याने वटला नसल्याचे कारमालकाने सांगितले. त्यानंतर फिर्यादींनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
व्हीआयपी कार्डचा वापर
सिद्धार्थ झेंडे याने आपली व्हीआयपी लोकांशी ओळख असल्याचे सातत्याने भासविले. येथे भरपूर जमीन, स्टड फार्म असल्याचे सांगितले. त्याच्या पत्नीनेही मंत्र्यांची नातेवाईक असल्याचे सांगितले. मुंबईला येता जाताना त्याने टोलनाक्यावर कोणतेतरी व्हीआयपी कार्ड दाखवून टोल न भरता ते जात होते. गाडीच्या आत सायरन बसविला होता. त्याचा चालकही साहेबांच्या मंत्रालयात खूप ओळखी असल्याचे सांगत असल्याचे फिर्यादींचा विश्वास बसला.