ऑम्लेट बनवता येत नाही म्हणून नवऱ्याने दाबला बायकोचा गळा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 03:54 PM2022-10-21T15:54:12+5:302022-10-21T15:55:24+5:30
पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिस हवालदाराला अटक...
धनकवडी (पुणे) : पत्नीला ऑम्लेट नीट बनवता येत नाही म्हणून तिचा गळा दाबून खूनाचा प्रयत्न केला. मुलगा सोडविण्यासाठी गेल्यानंतर त्याला लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पती-पत्नीने परस्परविरोधी तक्रार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
मनिष मदनसिंग गौड (५०, दत्तविहार सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) असे खूनाचा प्रयत्न आणि मारहाण करणाऱ्या पतीचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करणारा पती पोलीस हवालदार असून या प्रकरणी संबधित पोलिस हवालदारालाच भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिष गौड पोलिस मुख्यालयात नेमणुकीस आहे. तो आंबेगाव बुद्रुक येथील दत्तविहार सोसायटीमध्ये राहण्यास आहे. बुधवारी (दि. १९) ऑक्टोबर रोजी सात वाजण्याच्या सुमारास मनिष यांच्या पत्नीने त्यांच्यासाठी ऑम्लेट बनवले. बनविलेल्या ऑमलेटमध्ये काहीतरी बिघाड असल्याने मनिष हा पत्नीवर ओरडला. मोठ्याने ओरडून शिवीगाळ केली. तुला ऑमलेटही नीट बनवून देता येत नाही का, असे म्हणत त्यांच्या अंगावर धाऊन गेला.
हाताने मारहाण करून फ्रिजवर ठेवलेली इलेक्ट्रॉिनीक पक्कड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. फिर्यादीला खाली पाडून त्यानंतर दोन्ही हातने फिर्यादीचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीचा मुलगा भांडण सोडविण्यासाठी आला असता त्याला लाथाबुक्क्यानी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन धामणे करत आहेत.