गुंगीचे औषध देऊन पत्नीचा खून करणाऱ्या पतीला अखेर अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 09:22 PM2022-11-22T21:22:24+5:302022-11-22T21:22:33+5:30
बनाव करून केलेल्या खुनाची पौड पोलिसांकडून शिताफीने उकल
पौड : कासार आंबोली ता.मुळशी येथील प्रियंका क्षेत्रे हिला तिचाच पती स्वप्नील बिभीषण सावंत याने घातक औषधे देऊ ठार केले. ती आजारी असल्याचे भासवून तिला एका खाजगी रुग्णालयात देखील दाखल केले. परंतु ती दाखल करण्याअगोदरच मयत असल्याने तेथील डॉक्टरांनी पुढील कारवाईसाठी शासकीय रुग्णालय पौड येथे हलविण्यास सांगितले. पौड येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रियंका मयत असल्याची तक्रार पौड पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. स्वप्नीलने आपली पत्नी आजारी असल्याने व उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक खोटी माहिती पौड पोलीस ठाण्यात दिली होती. त्यांतर १५ नोव्हेबर रोजी प्रियंकाच्या आकस्मिक मृत्यूची नोंद पौड पोलीस स्टेशनला करण्यात आली. परंतु त्यानंतर प्रियंकाच्या नातेवाईकांनी स्वप्नील हा तिचा छळ करीत असून त्यानेच तिचा खून केला असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते. पौड पोलीसांनी त्या दृष्टीने तपास केल्यानतर प्रियंकाच्या खऱ्या मृत्यूचे कारण शोधण्यात पोलीसांना यश आले.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची अधिक माहिती अशी कि, मुळचा सांगवी ता.आस्ठी जि.बीड येथील असलेल्या स्वप्नील बरोबर प्रियंका हिचा मागील पाच महिन्यापूर्वीच प्रेम विवाह झाला होता. त्यांतर तो प्रियंकाला घेवून कासार आंबोली येथे राहण्यास आला होता. व घोटावडे फाटा येथे एका खाजगी रुग्णालयात नौकरीस लागला होता. या दरम्यान त्याची रुग्णालयातीलच परिचारिका असलेल्या प्रियंका पटेल हिच्याबरोबर सुत जुळले होते. त्याला तिच्याबरोबर दुसरा विवाह करायचा होता. त्यामुळे त्याने अत्यंत बुद्धिमानपणे रुग्णालयातील औषध घरी आणून तिला जीवे मारण्याच्या हेतूने भुलीच्या औषधाबरोबरच शुगर कमी करण्याची व रक्तदाब कमी करण्याची औषधे प्रियंका क्षेत्रे हिला देवून तिचा खून केला होता. पौड पोलिसांच्या टीमने अथक प्रयत्नाने या खुनाची उकल केली. त्याबाबतची कबुली स्वप्नीलने दिली आहे. त्यांतर त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील सावंत याला अटक करण्यात आली असल्याची माहिती फौजदार श्रीकांत जाधव यांनी दिली.