"विसर्जन मिरवणुकीला आमच्यामुळेच उशीर झाला", पुण्यातील मानाच्या गणपतींनी केले मान्य

By नम्रता फडणीस | Updated: September 13, 2022 17:07 IST2022-09-13T17:07:02+5:302022-09-13T17:07:22+5:30

पुढील वर्षी मिरवणूक लवकरात लवकर संपविण्याचा प्रयत्न करू

the immersion procession was delayed because of us manache ganapathi of Pune | "विसर्जन मिरवणुकीला आमच्यामुळेच उशीर झाला", पुण्यातील मानाच्या गणपतींनी केले मान्य

"विसर्जन मिरवणुकीला आमच्यामुळेच उशीर झाला", पुण्यातील मानाच्या गणपतींनी केले मान्य

पुणे: यंदाच्या वर्षी विसर्जन मिरवणुकीला विलंब लागल्याची नैतिक जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत. पुढील वर्षात पथकांची संख्या कमी करता येईल का? किंवा पथकातील वादकांच्या संख्येबाबत मर्यादा असावी का? याचा विचार केला जाईल. दुस-याला दोष देण्यापेक्षा आम्ही आत्मपरीक्षण करणार आहोत. आमच्याकडून ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत, त्या त्या गोष्टी करुन पुढच्या वर्षीची मिरवणूक लवकरात लवकर संपविण्याचा प्रयत्न करू असे
आश्वासन मानाच्या गणपती मंडळाच्या पदाधिका-यांनी पत्रकार परिषदेत दिले.

यंदाच्या वर्षी मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक तब्बल 10 तासापेक्षा अधिक कालावधीपर्यंत चालल्याने विसर्जन सोहळा संपण्यास विलंब लागला, त्याविषयी बोलताना नितीन पंडित म्हणाले, यंदाच्या वर्षी मिरवणुकीला उशीर होण्यास अनेक कारणे आहेत. दोन वर्षाच्या  कोरोना महामारी नंतर उत्सव साजरा होत असल्याने भाविकांच्या भावना उर्त्स्फूत होत्या व मिरवणूक मार्गावर भाविकांची गर्दी खूप असल्याने मिरवणुकीचा वेग मंदावला. मिरवणूक
सुरळीत पार पाडणे ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी असली तरी आम्ही त्याची नैतिक जबाबदारी स्विकारुन पुढील रुपरेषा ठरवणार आहोत.

दरम्यान,  लक्ष्मी रस्त्याने मानाच्या गणपतींच्या आधी विसर्जन मिरवणूक काढण्याची परवानगी याचिका नुकतीच उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामाध्यमातून भारतीय संस्कृतीची परंपरा जपली असून हा जय पराजय नाही, तर सक्षम व्यवस्थेवर विश्वास आहे, हे सिद्ध झाले आहे. पुणेकरांच्या श्रद्धेचा हा विजय आहे. मानाच्या गणपतींची मिरवणूक २४ तास चालते, या आरोपात काही तथ्य नाही. मानाचे गणपती इतर मंडळांना तुच्छतेची वागणूक
देतात, पोलीसांवर दबाव आणतात या गोष्टींना कुठलाही आधार नाही. ऐन गणेशोत्सवात न्यायालयात खेटे मारणे हे कार्यकर्ता म्हणून अत्यंत दुर्दैवी आहे. मुळातच याचिकाकर्त्या मंडळाने आम्हाला किंवा पोलीस प्रशासनाशी याबाबत कोणतीही चर्चा केली नाही. आमच्या हातात थेट नोटीसा पडल्या.  पुढीलवर्षी परंपरा अबाधित ठेवून परिवर्तनाची कास धरण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत असे पदाधिका-यांनी सांगितले.

यावेळी श्री कसबा गणपती मंडळाचे ॠग्वेद निरगुडकर, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रसाद कुलकर्णी, श्री गुरुजी तालीम मंडळाचे प्रविण परदेशी, श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, श्री केसरी वाडा गणपती मंडळाचे अनिल सकपाळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन आदी उपस्थित होते.

Web Title: the immersion procession was delayed because of us manache ganapathi of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.